मनपाची सभा वादळी ठरणार
By admin | Published: January 15, 2016 03:41 AM2016-01-15T03:41:52+5:302016-01-15T03:41:52+5:30
सभागृहात चर्चा न झाल्याने मागील काही महिन्यापासून प्रभागातील समस्या मार्गी लागलेल्या नाही.
नागपूर : सभागृहात चर्चा न झाल्याने मागील काही महिन्यापासून प्रभागातील समस्या मार्गी लागलेल्या नाही. परंतु पुढील वर्षात महापालिकेची निवडणूक आहे. समस्या सुटल्या नाही तर निवडणुकीत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने नगरसेवक सक्रिय झाले आहेत. याचे पडसाद मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत उमटणार असल्याने ही सभा वादळी ठरणार आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सभागृहात एक तास प्रश्नोत्तराचा असतो. परंतु गेल्या सहा महिन्यात सदस्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चाच झालेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी सदस्य आक्र मक झालेले आहेत. प्रभागातील प्रस्तावित विकास कामांना मंजुरी मिळाली. परंतु एलबीटी रद्द केल्याने तिजोरीत पैसा नसल्याने निधीअभावी प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच काही प्रभागात कचरा, पथदिव्यांच्या समस्यासंदर्भात तक्रारी आहेत. नगरसेवकांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सफाई कामगारांच्या समस्या, ई-गव्हर्नन्स यंत्रणा, घरकूल योजना, शहरातील नाली बांधकाम, तसेच महापालिकेच्या विविध विभागातील रिक्त पदे , काही प्रभागातील नाल्या व रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. काही कामांना दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी अभावी ती करता आलेली नाही. यामुळे सदस्यांत नाराजी आहे. अनेक महत्त्वाच्या विषयावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रलंबित प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. (प्रतिनिधी)