राष्ट्रवादीचे युवा नेते फुंकणार विदर्भात रणशिंग, बुधवारी विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक; रोहीत पवारही येणार
By आनंद डेकाटे | Updated: September 12, 2023 02:33 IST2023-09-12T02:32:03+5:302023-09-12T02:33:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या राज्यभरात सभा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे युवा नेतेही मैदानात उतरूण संघर्षाचे रणशिंग फुंकणार आहेत.

राष्ट्रवादीचे युवा नेते फुंकणार विदर्भात रणशिंग, बुधवारी विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक; रोहीत पवारही येणार
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या राज्यभरात सभा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे युवा नेतेही मैदानात उतरूण संघर्षाचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यानुसार येत्या १३ सप्टेंबरला नागपूरमध्ये विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला राष्ट्रवादीतील युवा नेते सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
देशमुख यांनी सांगितले, या विदर्भस्तरीय बैठकीतून पक्ष विस्तारासंदर्भातील मंथन होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांचे १३ सप्टेंबरला सकाळी नागपुरात आमगन होईल, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनतर दुपारी स्वागत लॉन येथे आयोजित विदर्भस्तरीय बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यानंतर इंडिया आघाडीत सहभागी समविचारी घटकपक्षांचीही रवी भवन येथे बैठक होणार आहे. या भेटीदरम्यान युवा नेते मंडळी शहरातील धार्मिक स्थळांनादेखील भेटी देतील. सकाळी दीक्षाभूमी, गणेश टेकडी येथे तर सायंकाळी ताजबाग येथे दर्शनासाठी जातील. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, राजू राऊत, प्रदेश प्रवक्ते वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.