पाच राज्यांच्या व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांची आजपासून नागपुरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:10 AM2021-02-17T04:10:14+5:302021-02-17T04:10:14+5:30
नागपूर - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत पाच राज्यांतील व्याघ्र प्रकल्पांमधील क्षेत्र संचालकांची आणि मुख्य वन्यजीव रक्षकांची दोनदिवसीय बैठक १७ ...
नागपूर - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत पाच राज्यांतील व्याघ्र प्रकल्पांमधील क्षेत्र संचालकांची आणि मुख्य वन्यजीव रक्षकांची दोनदिवसीय बैठक १७ व १८ फेब्रुवारीला येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगडमधील व्याघ्र प्रकल्पांशी संबंधित असलेले हे अधिकारी या बैठकीत व्यवस्थापन, प्रभावीपणा मूल्यांकन अहवाल, अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल, तसेच २०१९ मध्ये करण्यात आलेल्या शिफारशी व सूचनांवर घेतलेल्या चर्चा, आढावा यासह विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने मुख्य वन्यजीव रक्षक आणि सर्व व्याघ्र प्रदेशातील क्षेत्र संचालकांची एकत्रित बैठक दिल्ली येथे घेण्याऐवजी तीन ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथे होणाऱ्या या बैठकीपूर्वी अशा दोन बैठका अन्य ठिकाणी झाल्या आहेत.
या बैठकीत विविध व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक सहभागी होणार असून अचनकमार, इंद्रावती व उदंती (छत्तीसगड), बांधवगड, कान्हा, पन्ना, पेंच, संजय-दुबरी आणि सातपुरा (सर्व मध्य प्रदेश), सातकोसिया आणि सिंपलीपाल (ओडिशा), मुकुंद्रा हिल्स, रणथंभोर आणि सरिस्का (राजस्थान), तसेच मेळघाट, पेंच आणि बोर, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा - अंधारी ( महाराष्ट्र) या पाच राज्यांमधील मुख्य वन्यजीव रक्षक आणि एनटीसीएचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
निर्धारित कार्यक्रमानुसार, ९.४० वाजता राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर यांच्या प्रस्ताविकाने या परिषदेला प्रारंभ होईल. नंतर होणाऱ्या तांत्रिक सत्रांमध्ये सर्व राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील. १८ तारखेला हे सर्व अधिकारी पेंच प्रकल्पालाही भेट देणार आहेत.