सोनिया, राहुल गांधी यांची उद्या सभा
By admin | Published: April 10, 2016 03:05 AM2016-04-10T03:05:07+5:302016-04-10T03:05:07+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित सभेसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे.
दीक्षाभूमीवर जाऊन दर्शनही घेणार : काँग्रेस सज्ज, गर्दीची अपेक्षा
नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित सभेसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. दोन्ही नेते प्रारंभी दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेणार आहेत. या सभेचे जोरात नियोजन करण्यात आले असून लाखावर गर्दीची काँग्रेसला अपेक्षा आहे. बैठकांचे सत्र आटोपल्यानंतर आता तयारीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले. आता ११ एप्रिल रोजी नागपुरात समारोपीय सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, माजी खासदार आदी सुमारे पावणेदोनशे व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण शनिवारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. पदाधिकाऱ्यांसह त्यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. तेथील व्यवस्था, सुरक्षेचा आढावा घेतला. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, अनंतराव घारड, शहर अध्यक्ष विकास ठाकरे आदी पदाधिकारी होते. यानंतर सायंकाळी नेत्यांकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. सभेसाठी सुमारे दोन लाख लोक येतील, असे नियोजन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण सभेपर्यंत नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत.