नागपुरातील सीताबर्डीत मेफेड्रॉन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:50 PM2019-04-22T23:50:14+5:302019-04-22T23:50:54+5:30
अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या कारवाया वेगवेगळ्या पोलीस पथकाने बजावल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमली पदार्थातील सर्वात घातक आणि महागडा पदार्थ समजले जाणाऱ्या एमडी (मेफेड्रॉन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी अशा २४ तासात सीताबर्डीत या दोन वेगवेगळ्या कारवाया वेगवेगळ्या पोलीस पथकाने बजावल्या.
सीताबर्डीतील आनंदनगरात राहणारा आरोपी मृणाल मयूर गजभिये (वय २३) एमडीची खेप घेऊन येणार असल्याची माहिती सीताबर्डीचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी कारवाईसाठी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीताबर्डी पोलिसांनी रविवारी दुपारी २ च्या सुमारास आनंदनगरातील बॉम्बे स्कूटर्सच्या मागे धाव घेतली. आरोपी गजभिये येताना दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चक्क ३५ ग्राम एमडी पावडर मिळाले. बाजारात त्याची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. ते पावडर आणि ५०० रुपये जप्त करण्यात आले. सीताबर्डी ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गजभियेला अटक करण्यात आली. आरोपी मृणाल गजभिये गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली सीताबर्डीत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यापासून तो फरार होता.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक प्रवीण काळे, उपनिरीक्षक एस. बी. काळे, एस. सी. चव्हाण, हवालदार अजय काळे, नायक विशाल अंकलवार, ओमप्रकाश भरतिया, शिपायी प्रीतम यादव, संदीप भोकरे तसेच गुन्हे शाखेचे हवालदार दत्ता बागुल यांनी ही कामगिरी बजावली.
गुन्हे शाखेचीही कारवाई
शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनमोल सिद्धार्थ खोब्रागडे (वय ३२) याला जेरबंद केले. त्याच्याकडून ८१ हजार रुपये किमतीचे २७ ग्राम मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजू बहादुरे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली. विशेष म्हणजे, पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबाबत ४८ तास गुप्तता पाळली. ती कोणत्या कारणामुळे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.