तरुणांनाे सज्ज व्हा, संरक्षण दलात १.१० लाख पदांची मेगाभरती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:26 PM2023-11-03T12:26:06+5:302023-11-03T12:27:22+5:30
एसएससी जीडी, सीआरपीएफच्या जागा : २४ नाेव्हेंबरपासून अर्ज करण्याची तारीख
नागपूर : भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाे सज्ज व्हा. संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या गटांत एक लाख १० हजार पदांची मेगाभरती हाेत आहे. १८ ते २३ वयाेगटातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
बेराेजगारी हा अभिशाप असला तरी शाेधणाऱ्यांना नाेकरीची कमतरता नाही. संरक्षण दलातील नाेकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डाॅ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली. ‘एसएससी जीडी’ या पदाच्या ८४,८६६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासह सीआरपीएफ काॅन्स्टेबल पदाच्या ३० हजार जागांची भरती घेण्यात येत आहे. २४ नाेव्हेंबरपासून या दाेन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असून, २८ डिसेंबर अंतिम मुदत आहे. विद्यार्थी या दाेन्ही गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या पदांच्या परीक्षा हाेणार असल्याचे डाॅ. वानखडे यांनी सांगितले.
या दाेन्ही पदांसाठी मुला- मुलींची उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. निवड झालेल्या उमेदवाराला ४० ते ४५ हजारांपर्यंत पगार मिळू शकताे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी माेठी असल्याचे त्यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी फाउंडेशनचे प्रयत्न
‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या माध्यमातून विदर्भात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिराेलीसारख्या दुर्गम भागात संस्थेने जनजागृती माेहीम राबविली. विदर्भात आतापर्यंत ७० ठिकाणी शिबिरे घेऊन संरक्षण दलातील करिअरची माहिती दिली. संरक्षणाच्या तिन्ही दलांतील अनेक निवृत्त व कार्यरत अधिकारी या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा देत आहेत.
संरक्षण क्षेत्रात नाेकरीच्या असंख्य संधी उपलब्ध हाेतात. दरवर्षी दाेनदा भरती हाेते. मात्र, संरक्षण दलाच्या करिअरबाबत जनजागृतीचा अभाव विदर्भात बघायला मिळताे. संरक्षण क्षेत्रात अधिकारी पदासाठी १८ ते २३ वयाेगटाचा काळ अतिशय महत्त्वाचा असताे. एनडीएसारख्या परीक्षा महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थी व पालकांनी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे व देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण याेगदान द्यावे.
- डाॅ. राजेश्वरी वानखडे, अध्यक्षा, लाइफ स्किल फाउंडेशन