सदस्य जिल्हा परिषदेत, बैठक मात्र ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:11 AM2021-08-21T04:11:09+5:302021-08-21T04:11:09+5:30
कुणाला ऐकू येईना, कुणाला बोलता येईना : बैठकीत नुसता कोंबडबाजार नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन ...
कुणाला ऐकू येईना, कुणाला बोलता येईना : बैठकीत नुसता कोंबडबाजार
नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन पार पडली. पण बैठकीला उपस्थित असलेले ७० टक्के सदस्य जिल्हा परिषदेतच उपस्थित होते. कुणी उपाध्यक्षांच्या कक्षातून बैठकीत सहभागी झाले, कुणी चबुतऱ्यावर बसले, काही सदस्य चालते-फिरते बैठकीत उपस्थित होते. काहींनी जिल्हा परिषदेच्या परिसरात पार्किंगमधून बैठकीत उपस्थित दर्शविली. आयोजकापासून सहभागी होणारे सदस्य एकाच इमारतीत असेल तर ऑनलाईन बैठकीला अर्थ काय?
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जि.प.च्या बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिले. पण ऑनलाईन बैठका म्हणजे निव्वळ कोंबडबाजार असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत ऑनलाईन बैठकीत याची प्रचिती आली. बैठकीत कुणालाही धड बोलता येत नव्हते. कुणाचे आवाज नीट ऐकू येत नव्हते. सदस्यांना विषय मांडता आला नाही, अनेकांना तर बोलताही आले नाही, अध्यक्षांना रुलिंगसुद्धा देता आली नाही. निव्वळ औपचारिकता म्हणून बैठक पार पडली. तीन महिन्यातून एकदा होणाऱ्या या बैठकीतून ग्रामीण भागातील समस्या जिथच्या तिथेच राहिल्या.
- बैठकीचे हास्यास्पद आयोजन
अध्यक्षांच्या कक्षातून ऑनलाईन बैठकीचे संचालन होत होते. अध्यक्षांसह सर्व सभापती व अधिकारी अध्यक्षांच्या कक्षात बसले होते. काँग्रेसचे काही सदस्य त्यांच्या ॲण्टीचेंबरमध्ये बसून बैठकीत सहभागी झाले होते. काही महिला सदस्य उपाध्यक्षांच्या कक्षातून बैठकीत सहभागी झाल्या होत्या. विरोधी पक्षाच्या दोन सदस्यांनी बाकावर बसून बैठक अटेंड केली. एका सदस्याने परिसरात कार पार्क करून त्यातून बैठक अटेंड केली. काही सदस्य इमारतीच्या परिसरात चालत-फिरत बैठकीत सहभागी झाले. या बैठकीचे कुणाला किती गांभीर्य होतं, हा त्यांचा विषय. पण एकाच ठिकाणी सर्व असताना बैठक ऑनलाईन हे मात्र हास्यास्पद ठरले.
- त्या १२ सदस्यांना मात्र समाधान
यशदाच्या प्रशिक्षणासाठी जि.प.चे १२ सदस्य पुणे येथे गेले आहेत. त्या १२ सदस्यांनी काही वेळ ऑनलाईन बैठकीत उपस्थिती दर्शविली. बैठकीला त्यांची उपस्थिती एवढेच ऑनलाईन बैठकीचे फलित.
- सदस्यांनी बैठकीत समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याच समस्या सुटल्या नाही. औपचारिकता म्हणून बैठक पार पडली. ही बैठक तहकूब करून ऑफलाईन घेण्याची आम्ही मागणी केली होती.
व्यंकट कारेमोरे, विरोधी पक्षनेते, जि.प.
- ऑनलाईन बैठकीतून समस्यांची गंभीरता लक्षात येत नाही, सदस्यांना बोलता येत नाही. पण बैठक ऑनलाईन घ्यावी हा शासनाचा निर्णय आहे. आमचा नाईलाज आहे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.