नासुप्र व महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र यांच्यात सामंजस्य करार
By admin | Published: September 12, 2016 02:58 AM2016-09-12T02:58:09+5:302016-09-12T02:58:09+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल गव्हर्नन्स या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक भाग म्हणून नागरी व ग्रामीण भागात स्मार्ट सिटी
निर्णय प्रक्रियेला गती : डिजिटल गव्हर्नन्सला बळकटी मिळणार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल गव्हर्नन्स या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक भाग म्हणून नागरी व ग्रामीण भागात स्मार्ट सिटी आणि स्मार्ट गावे निर्माण करण्यात येणार आहे. ही संकल्पना साकार करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)आणि महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र यांच्यात रविवारी सामंजस्य करार करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर व महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक सुब्रतो दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नासुप्रच्या नागपूर शहरातील कार्यक्षेत्रात वाढ करून नासुप्रकडे नागपूर महानगर नियोजन क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल गव्हर्नन्स या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नासुप्रने रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिकल इन्फर्मेशन प्रणालीचा वापर करून निर्णयक्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचा प्रयत्न आहे.
यासाठी आवश्यक ती संगणक प्रणाली व निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, डेटा तयार करण्यासाठी सुदूर संवेदन उपयोजन केंद्राची मदत घेतली जाणार आहे. यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या करारानुसार नासुप्रच्या कार्यक्षेत्रासाठी हाय रेझ्युलेशन सॅटेलाईट डाटा, मोजणी विभागाचे नकाशे, नासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे नकाशे, मलवाहिका, जलवाहिका, अतिउच्च दाबाच्या व इतर विद्युत वाहिन्या, इत्यादीचा जिओ अवकाशीय करणे, उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रे म्हणजेच सॅटेलाईट इमेज बेस डाटा तयार करून त्याचे कॅडेस्ट्रल नकाशासोबत जिओ रेफसिंग करणे, महानगर क्षेत्र विकास योजनेच्या नकाशाचे बेस मॅपसोबत इंटिग्रेशन करणे, नासुप्रच्या विकास कामांची देखरेख, मोबाईल अप्लिकेशन तयार करणे, तसेच उपरोक्त सर्व माहिती संकेतस्थळावर देण्याकरिता वेब ब्राऊशर अप्लिकेशन, पोर्टल तयार करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. (प्रतिनिधी)