दैनावस्थेवर अश्रू ढाळतेय इतवारीतील शहिदांचे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:22 AM2020-08-09T00:22:58+5:302020-08-09T00:27:24+5:30
इतवारीतील शहीद स्मारकाची दैनावस्था पाहून याची जाणीव होते. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने कचरा पसरलेला आहे, सौंदर्यीकरणाचे नाव नाही, इतिहासाच्या नोंदीही मिटत चालल्या आहेत आणि अतिक्रमणामुळे स्मारकाचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या, प्रसंगी प्राणाची बाजी लावणाऱ्या शहिदांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. त्या वीरांच्या स्मृतींना उजाळा म्हणून शहीद स्मारकांची उभारणी करण्यात आली. मात्र काळ पुढे सरकतो तसे त्या शहिदांच्या आठवणी व त्यांच्या स्मारकांचा सन्मान विस्मृतीत जात आहे. इतवारीतील शहीद स्मारकाची दैनावस्था पाहून याची जाणीव होते. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने कचरा पसरलेला आहे, सौंदर्यीकरणाचे नाव नाही, इतिहासाच्या नोंदीही मिटत चालल्या आहेत आणि अतिक्रमणामुळे स्मारकाचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारावलेला तो काळ होता. १९४२ ला महात्मा गांधी व राष्ट्रीय नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ची घोषणा दिली आणि देश पेटून उठला. या वणव्याची ठिणगी नागपुरातही पडली. गांधीजींच्या अटकेच्या वृत्ताने हा वणवा आणखी भडकला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. मेयो रुग्णालयासमोर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कृष्णराव काकडे शहीद झाले. महाल भागात झालेल्या गोळीबारात वडिलांचा मृत्यू झाल्याने १७ वर्षाचे शंकर महाले आंदोलनात उतरले. त्यांच्या साथीदारांनी चिटणवीसपुरा पोलीस चौकीवर हल्ला केला. यानंतर महालेंसह आंदोलनातील पाच जणांना फाशी देण्यात आली. लोकांमध्ये असंतोष भडकला होता. सतत आठ दिवस ही धगधग चालली होती. अनेकांनी आपले प्राण गमावले तर अनेकजण भूमिगत झाले. जुना भंडारा रोडवर झालेल्या गोळीबारात आठ आंदोलक शहीद झाले. म्हणूनच गोळीबार चौक अशीच त्याची ओळख आहे. त्या चौकातील स्मारकांवर शहिदांच्या नावाचा उल्लेख आहे. आंदोलनकर्त्यांनी इतवारीतील पोस्ट ऑफिस जाळल्याची नोंद आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिक डॉ. संतोष मोदी यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. या चौकात नागपुरातील नामांकित राजकीय नेत्यांची बैठक होती. जनरल मंचरशा आवारी, महात्मा भगवान दिन, पूनमचंद रांका, लालचंद मोदी, प्यारेलाल गोयल, महादेव मोदी, पन्नालाल देवडिया, भोलासिंग नायक, रामचंद्रसाव लांजेवार, विद्यावती देवडिया, दीनदयाल गुप्ता, वामनराव गावंडे यांच्यासह अनेकविध नेत्यांच्या उपस्थितीने हा चौक नेहमी गजबजला आहे. जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी १९६२ पासून शहीद स्मारकापासून आंदोलन सुरू केले होते.
कचरा, अतिक्रमण, दारूच्या बॉटल्स
अनेक दिवसांपासून स्मारकाच्या परिसराची साफसफाई न झाल्यामुळे सभोवताल कचरा पसरलेला आहे. स्मारकाचे संगमरवर अनेक भागातून खंडित झाले आहे. स्मारकाच्या परिसरात श्वानांचा आराम चाललेला असतो. असामाजिक तत्त्वांचा वावर येथे राहत असल्याने स्तंभाजवळच मद्य व पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या दिसून येतात. फेरीवाले, पावभाजीचे ठेलेवाले आणि काही स्थानिक दुकानदारांचेही अतिक्रमण येथे झालेले दिसून येते. काही दुकानदार येथेच साहित्यही ठेवतात व कचराही टाकतात. अवैध होर्डिंग्जने स्मारकावरच कब्जा केल्याचे दिसते, त्यामुळे स्मारकाचाच शोध घ्यावा लागतो. स्मारकाच्या लोखंडी रॉडला दुकानदार कापडी छत बांधतात. स्मारकाचे सौंदर्यीकरणही करण्यात आले पण देखभाल दुरुस्तीअभावी पुन्हा त्याची दुरवस्था होत आहे.
स्मारकाचा इतिहास
डॉ. संतोष मोदी यांनी सांगितले, या धगधगत्या इतिहासाची आठवण म्हणून स्वातंत्र्याच्या काही महिन्यांपूर्वी त्यावेळी शहराचे केंद्र असलेल्या इतवारी भागात हे स्मारक उभे करण्यात आले. मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यपाल मंगलदास पक्वासा, काँग्रेस अध्यक्ष कृपलानी यांच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर १९४६ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाल्याचा येथे उल्लेख आहे. यावेळी आझाद यांनी व्यक्त केलेल्या भावना स्मारकावर कोरल्या आहेत. चार पायऱ्या चढून गेल्यानंतर उंच शहीद स्तंभ आहे. त्यामागे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. पुढे दरवर्षी हजारो लोक या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी गोळा होत पण आता कुणाला त्याची आठवणही होत नसल्याची खंत डॉ. मोदी यांनी व्यक्त केली.