‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग
By दयानंद पाईकराव | Published: February 13, 2024 05:04 PM2024-02-13T17:04:37+5:302024-02-13T17:05:51+5:30
ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
नागपूर : संशयी स्वभाव असल्यामुळे बोलणे बंद केल्यामुळे आरोपीने तिचा हात पकडून ‘तु माझ्याशी बोलत का नाहीस’ असे म्हणत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
चेतन वासुदेव घरत (२८, रा. कामना नगर, ठाकरे ले आऊट, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी चेतन आणि अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २६ वर्षीय तरुणीची ओळख स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये २२ ऑक्टोबर २०२३ ला झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. परंतु त्यानंतर आरोपी युवतीवर संशय घेऊ लागला. दुसऱ्या सोबत बोलु नकोस, असे म्हणून तिच्यावर दबाव टाकत होता. युवती खासगी जॉब करीत असलेल्या ठिकाणी जाऊनही तो तिला त्रास देऊ लागला होता.
आरोपीचा संशयी स्वभाव पाहून युवतीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. त्यामुळे आरोपी चेतन संतप्त झाला. त्याने युवतीचा पाठलाग करून ‘तु माझ्याशी बोलत का नाहीस’ असे म्हणून तिचा हात पकडून जवळीक साधत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. युवतीने विरोध केला असता त्याने शिविगाळ करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून अजनीचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल दौंड यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), ३२३, ५०४, ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास अजनी पोलिस करीत आहेत.