महिलांपेक्षा पुरुष अधिक पीडित; पुरुष आयोगाच्या अध्यक्षा बरखा त्रेहन यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 09:53 PM2022-04-08T21:53:54+5:302022-04-08T21:54:28+5:30
Nagpur News देशामध्ये महिलांना झुकते माप दिले गेल्यामुळे पुरुषांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा दिल्लीतील पुरुष आयोगाच्या अध्यक्ष बरखा त्रेहन यांनी केला.
नागपूर : महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी पुरुष नेहमीच धावून जातात. परंतु, पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी एखादी महिला जाहीरपणे पुढे आल्याची उदाहरणे विरळ आहेत. अशीच एक महिला आहे, बरखा त्रेहन. बरखा नवी दिल्ली येथील रहिवासी असून, त्यांनी पुरुषांच्या अधिकारांकरिता लढण्यासाठी पुरुष आयोग संस्था स्थापन केली आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन देशामध्ये महिलांना झुकते माप दिले गेल्यामुळे पुरुषांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा केला.
महिलांना आजही अबला समजले जाते. त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. महिला कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. महिला आयोग व विविध विशेष कायदे आहेत. परिणामी, महिला सुरक्षित झाल्या; पण यातून पुरुषांवरील अत्याचार वाढायला सुरुवात झाली. आजच्या काळात पुरुषपीडित महिलांपेक्षा, महिलापीडित पुरुषांची संख्या जास्त आहे. परंतु, पुरुषांवरील अत्याचारांना कुणीच गांभीर्याने घेत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. करिता, पुरुष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. त्यांनाही आता विशेष संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे देशात पुरुषांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करणे व पुरुष आयोग स्थापन करणे आवश्यक आहे, असे बरखा यांनी सांगितले.
पुरुष अधिक पीडित
बरखा यांनी विविध आकडेवारी सादर करून महिलांपेक्षा पुरुष अधिक पीडित असल्याचे स्पष्ट केले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० मधील अहवालानुसार, देशात आत्महत्या करणाऱ्यांपैकी ७१ टक्के संख्या पुरुषांची आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ही संख्या महिलांपेक्षा अडीचपट जास्त आहे. दर नऊ मिनिटात एक विवाहित पुरुष आत्महत्या करतो, तसेच जगातील कौटुंबिक हिंसाचार पीडित पुरुषांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती बरखा यांनी दिली.