नागपुरात देशी दारूच्या दुकानाविरुद्ध पुरुषांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 08:44 PM2019-07-12T20:44:36+5:302019-07-12T20:47:54+5:30
आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनही सादर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनही सादर केले आहे.
गिट्टीखदान चौक ते गोरेवाडा रोड दरम्यान चौबे कटीया भंडारला लागून असलेल्या मन्नू हिरणवार यांच्या इमारतीमध्ये नवीन देशी दारूचे दुकान उघडले आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिसरातील नागरिकांनी याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करीत या दुकानाला परवानगी मिळू नये, अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत हे दुकान अवैध असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. सर्वप्रथम कुठलेही देशी दारूचे दुकान हे शाळेच्या १०० फुटाच्या आत असून नये, असा नियम आहे. या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर उर्दू स्कुल आहे. मनपाची अंगणवाडी आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्युट लागूनच आहे. या संस्था २० वर्षांपासून आहेत.
हिरणवार यांची इमारत ही पूर्णत: अनधिकृत आहे. या इमारतीला मनपा किंवा नासुप्रची मंजुरी नाही. त्यावरील बांधकाम अवैध आहे. १८०० चौरस फूटाचा प्लॉट असून त्यावर ३४०० चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या बाजूच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. पार्किंगसाठी जागा नाही. अशा परिस्थितीत येथे दारू दुकान सुरु झाल्यास वाहतुकीसह सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांचा दारू दुकानाला तीव्र विरोध आहे. तेव्हा याला परवानही देऊ नका, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिष्टमंडळात घनश्याम मांगे, यशवंत तेलंग, राकेश बोबडे, भूपेंद्र ठक्करजी, विकास ओबेरॉय, श्रीराम सिंग, कृष्णदत्त चौबे आदींचा समावेश होता.
अधिकाऱ्यांचेही संगनमत
येथील प्रतिष्ठित नागरिकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी देशी दारूचे दुकान उघडले जात आहे, ते अवैध आहे. कुठल्याही नियमात ते बसत नाही. इमारत सुद्धा अवैध आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना आहे. मागील २०-२५ दिवसापासून तपास अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने जागेचे मोजमाप करीत आहेत. ते करताना तक्रारकर्त्यांना नागरिकांनाही विश्वासात न घेता एकतर्फी कार्यवाही करतात, त्यामुळे अधिकाºयांचेही संगनमत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
एक कि.मी. परिसरात आधीच तीन-चार देशी दारूचे दुकान
जानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने देशी दारूचे दुकान १ कि.मी. च्या आत उघडण्यास मनाई केलेली आहे. गिट्टीखदान चौक ते अनंतनगर पर्यंत या अर्धा कि.मी. अंतरवर किमान ३ ते ४ दारूची दुकाने आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा नवीन दारूच्या दुकानाला परवानगी कशी दिली जाऊ शकते, असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
२२ जुलैपासून आंदोलन
येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही येथे दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा नागरिकांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे तो प्रयत्न फसला. परंतु पुन्हा दारूचे दुकान उघडले जात आहे. त्यामुळे नागरिक संतापले आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात निवेदनाद्वारे करण्यात आली असून येत्या २२ जुलैपासून आंदोलनला सुरुवात केली जाईल.