मासिक पाळी स्वच्छता दिन; २६ टक्के तरुणी वापरतात कापड; वर्धा जिल्हा सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरात अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 07:30 AM2022-05-28T07:30:00+5:302022-05-28T07:30:02+5:30
Nagpur News स्त्रीने प्रत्येक मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात याचे प्रमाण सुधारत असले तरी २६ टक्के महिला मासिक पाळीच्या वेळी कापडाचा वापर करीत असल्याचे पुढे आले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : मासिक पाळीचा संबंध स्त्रीच्या आरोग्याशी निगडित असतो. त्यामुळे स्त्रीने प्रत्येक मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात याचे प्रमाण सुधारत असले तरी २६ टक्के महिला मासिक पाळीच्या वेळी कापडाचा वापर करीत असल्याचे पुढे आले आहे.
स्त्रियांना अथवा मुलींना दिवसभर शिक्षण अथवा कामामुळे घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान काही जणी दिवसभर एकच ‘सॅनिटरी पॅड’ वापरतात. काही स्त्रिया आजही मासिक पाळीसाठी घरगुती कपड्यांचा वापर करतात. या कपड्यांची नीट स्वच्छतादेखील राखली जात नाही. यामुळे स्त्रियांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५’नुसार महाराष्ट्रातील १५ ते २४ वयोगटातील ७६ टक्के तरुणी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात, तर २६ टक्के कापड वापरतात. १३ टक्के तरुणी स्थानिक पातळीवर तयार नॅपकिन्स वापरतात व २ टक्के तरुणी ‘टॅम्पन्स’ वापरतात.
- ८५ टक्के तरुणींकडून स्वच्छ पद्धतीचा वापर
राज्यात १५ ते २४ वयोगटातील ८५ टक्के तरुणींकडून मासिक पाळीदरम्यान स्वच्छ पद्धतीचा वापर होत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४’नुसार पाच वर्षांपूर्वी ६६ टक्के तरुणी स्वच्छ पद्धतीचा वापर करीत होत्या. सध्या राज्यातील ९० टक्के शहरी स्त्रिया तर, ८० टक्के ग्रामीण स्त्रिया मासिक पाळीदरम्यान स्वच्छता पद्धतीचा वापर करतात. यावरून ग्रामीण भागातही याचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते.
-विदर्भात वर्धेतील महिलांकडून स्वच्छतेचा अधिक वापर
‘सर्व्हे’नुसार विदर्भातील ८४ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान स्वच्छ पद्धतीचा वापर करतात. यात पहिल्या क्रमांकावर वर्धा जिल्ह्यातील महिला आहेत. त्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा असून, प्रमाण ९३ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून, प्रमाण ८९ टक्के, चौथ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा असून, प्रमाण ८८.६ टक्के, तर पाचव्या क्रमांकावर नागपूर जिल्हा असून, त्याचे प्रमाण ८८.५ टक्के आहे. सर्वांत शेवटी बुलडाणा जिल्हा आहे, तिथे हे प्रमाण केवळ ७४ टक्के आहे.
-विदर्भातील महिला स्वच्छ पद्धतीचा वापराचे प्रमाण
जिल्हा : टक्केवारी
नागपूर : ८८.५
भंडारा : ९३
वर्धा : ९४
गोंदिया : ८८.६
गडचिरोली : ८०
अकोला : ७९
अमरावती : ८३
यवतमाळ : ८९
बुलडाणा : ७४
वाशिम : ७५