कोरोनानंतर वाढतोय मानसिक आजाराचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 08:38 PM2020-11-30T20:38:09+5:302020-11-30T20:41:24+5:30
Corona Nagpur News मानसिक स्थिती ढळू न देता कोरोनावर हिमतीने मात करणाऱ्यांमध्ये नंतर चिंता, नैराश्य आणि निद्रानाश ही लक्षणे दिसून येत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दर आठवड्यात अशा सात ते आठ रुग्णांची नोंद होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानसिक स्थिती ढळू न देता कोरोनावर हिमतीने मात करणाऱ्यांमध्ये नंतर चिंता, नैराश्य आणि निद्रानाश ही लक्षणे दिसून येत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दर आठवड्यात अशा सात ते आठ रुग्णांची नोंद होत आहे. साधारण १०० मधून १० टक्के रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत असल्याचे रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. याची दखल घेत आरोग्य विभागाने सर्व कोरोनाबाधित रुग्णांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना कोविड रुग्णालयांना दिल्या आहेत. त्यानुसार मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी कोविड हॉस्पिटलमध्येही या रुग्णांची तपासणी केली जात आहे. परंतु पोस्ट कोविड रुग्णांमध्ये मानसिक आजाराचा धोका वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
बाधितांमध्ये ‘एन्झायटी डिसऑर्डर’ची लक्षणे
डॉ. सोमानी यांनी सांगितले, कोरोनाबाधित रुग्णाला जेव्हा दाखल केले जाते तेव्हा त्यांच्या मनात आजाराविषयी भीती, रुग्णालयातील एकटेपणा व कुटुंबाची चिंता असते. या सर्वांचा मनावर परिणाम होतो. ही ‘एन्झायटी डिसऑर्डर’ची लक्षणे आहेत. अशा रुग्णांचे समुपदेशन केले जाते. काही रुग्णांमध्ये औषधोपचार केला जातो. परंतु रुग्णालयाची सवय झाल्यानंतर व कोरोना बरा होत असल्याचे पाहत त्यांच्यात लवकर सुधारही होता.
श्वास घेण्यास अडचण जात असल्याची भीती
कोरोनाचा मेंदू आणि मनावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मानसिक आजारांचा धोका वाढतो, असे अनुभव आतापर्यंत काही तज्ज्ञांनी वर्तविले आहेत. डॉ. सोमानी यांच्यानुसार, कोरोनाबाधित असताना मानसिक आजाराची लक्षणे दिसून न येणाऱ्या काही रुग्णांमध्ये कोरोनावर मात केल्यानंतर मानसिक ताणतणाव दिसून येत आहेत. अशा रुग्णांमध्ये श्वास घेण्यास अडचण जात असल्याची भीती, कुटुंबातातील सदस्यांची चिंता व निद्रानाशाची लक्षणे दिसतात. मेयोच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये आठवड्यातून सात ते आठ रुग्ण येत आहेत.