काळजी घ्या; मानसिक ताणामुळे वाढत आहेत हार्ट अटॅक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 12:09 PM2022-04-16T12:09:03+5:302022-04-16T12:13:32+5:30
शारीरिकपेक्षा मानसिक ताणामुळे ज्यांचे हृदय कमी निरोगी आहे, त्यांना अटॅक, स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो.
नागपूर : हृदयासंबंधित आजारामागे उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह किंवा लठ्ठपणा ही कारणे असली तरी, मानसिक ताण देखील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरतो. मानसिक ताणामुळे हृदयाच्या धमन्या अडचणी निर्माण करतात. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढू शकतो.
‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ने केलेल्या एका अभ्यासानुसार शारीरिकपेक्षा मानसिक ताणामुळे ज्यांचे हृदय कमी निरोगी आहे, त्यांना अटॅक, स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. संशोधनातून समोर आले की, मानसिक ताण ‘मायोकार्डिअल इस्किमिया’ची जोखीम वाढवतात. अशावेळी हृदयामध्ये रक्ताभिसरणाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. उच्च पातळीच्या मानसिक ताणामुळे हृदय स्ट्रोक, अटॅक येण्याची जोखीम दुपटीने वाढते.
- मानसिक ताणाची ही आहेत कारणे...
नोकरी जाणे, घरात झालेले मोठे नुकसान किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावणे, सतत आर्थिक अडचणींचा सामना करणे, चिंता करणे किंवा गंभीर नैराश्य ही मानसिक ताणाची कारणे असू शकतात. तज्ज्ञानुसार, तणाव वाढल्यावर मेंदूतील ‘फिअर सेंटर रिॲक्ट’ करते आणि ‘हार्मोेन रिलीज’ करू लागते. परिणामी, फॅट, बीपी आणि इन्सुलिन वाढू शकते. हे जेव्हा वारंवार होते, तेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये सूज येते. त्यामुळे रक्तामध्ये गाठी होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका होऊ शकतो.
- मेडिकलमध्ये रोज चार ते पाच ‘हार्ट अटॅक’चे रुग्ण - डॉ. पाटील
मेडिकलच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, मेडिकलमध्ये रोज जवळपास चार ते पाच ‘हार्ट अटॅक’चे रुग्ण येतात. अलीकडे या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराची जनजागृती वाढल्यामुळे आता अनेक जण छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत, रुग्णालयात येऊन उपचार घेतात.
- मानसिक ताणामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होतात - डॉ. देशमुख
वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोनामध्ये काही लोकांनी आपल्या जवळची माणसे गमावली, काहींना मोठा आर्थिक फटका बसला. यातून अनेकांना मानसिक ताणातून जावे लागले आहे, तर काही अजूनही जात असल्याने त्यांच्यात हृदयविकार दिसून येत आहे. दुसरे म्हणजे, मानसिक विकारामुळे ‘फिजिकल ॲक्टिव्हिटी’ कमी होतात. परिणामी खाणे वाढते, लठ्ठपणा वाढतो, कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढून हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
- शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात - डॉ. प्रशांत जगताप
वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या काही रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचे आढळून आले. कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्याची काही उदाहरणे आहेत. यात शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, याला वैद्यकीय भाषेत ‘थ्रॉम्बोसिस’ म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना सूज येते. याला वैद्यकीय भाषेत ‘मायकार्डायटीस म्हणतात. अलीकडे याचे रुग्ण अधिक दिसून येतात.
स्वत:साठीही वेळ काढा - डॉ. सोमाणी
मेयोच्या मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमाणी म्हणाले, मॉडर्न मेडिसीनच्या डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करीत असताना, त्याच्या मानसिक बाबी सुद्धा तपासून घ्यायला हव्यात. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय, तणावाला दूर ठेवण्यासाठी ‘वर्किंग लार्ईफ’, ‘सोशल लाईफ’ आणि ‘पर्सनल लाईफ’ या तिघांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. याशिवाय, मनसोक्त बोला. यामुळे मन कमजोर पडणार नाही. चांगल्या मित्राची कंपनी ठेवा व व्यसनापासून दूर राहा.