संतापजनक! निवासी शाळेत मतिमंद मुलीचा विनयभंग, तीन दिवसानंतर प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 14:17 IST2022-12-13T14:16:38+5:302022-12-13T14:17:53+5:30
संतप्त पालकांनी केली तोडफोड, शाळेत तणाव : आरोपीला अटक

संतापजनक! निवासी शाळेत मतिमंद मुलीचा विनयभंग, तीन दिवसानंतर प्रकार उघडकीस
नागपूर : निवासी शाळेत एका मतिमंद अल्पवयीन विद्यार्थिनीचा कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस येताच अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी निवासी शाळेत गोंधळ घातला. तसेच सोबत आलेल्या लोकांनी तेथे तोडफोड केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कर्मचारी एकनाथ जंजेवार (२८) याला अटक केली.
पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी जयताळा येथील निवासी शाळेत तीन महिन्यांपासून राहत होती. विनयभंगाची घटना ८ डिसेंबरच्या रात्री घडली. जेवण झाल्यानंतर आरोपी कर्मचाऱ्याने इतर विद्यार्थिनींना जाऊ दिले व त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आक्षेपार्ह वर्तन केले. मुलीने रविवारी पालकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालक व त्यांचे परिचित निवासी शाळेत पोहोचले. शिक्षकांनी पोलिसात तक्रार करण्याऐवजी ही घटना दडपल्याचा आरोप करत त्यांनी घोषणाबाजी केली. शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे लोकांनी वस्तू फेकून गोंधळ घातला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तोडफोड केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु नातेवाईकांनी आरोपीचे कृत्य सांगितल्यानंतर पोलिसांनी एकनाथविरुद्ध गुन्हा दाखल करणे योग्य मानले. एमआयडीसी पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एकनाथला अटक केली.