टाळेबंदीत वारांगणांसाठी व्यापारी वर्ग सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:38+5:302021-05-06T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रात्रंदिवस मेहनत करून पै-पै जोडणारा व्यापारी वर्ग कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत स्वत:च संकटात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रंदिवस मेहनत करून पै-पै जोडणारा व्यापारी वर्ग कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत स्वत:च संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरापासून व्यापार पूर्णत: कोलमडला आहे. मात्र, दानधर्मासाठी ओळखला जाणारा हा वर्ग वंचितांसाठी सज्ज आहे. संक्रमण आणि टाळेबंदीमुळे उपासमार ओढवलेल्या वारांगणांच्या दैनिक भरणपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
गेल्याच वर्षी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी क्षेत्रातील नागरिकांनी गरजूंच्या मदतीसाठी निश्चय फाऊंडेशनची स्थापना केली होती. तेव्हापासून मोठ्या संख्येने होत असलेल्या स्थलांतरितांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोरोनाचा ज्वर कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा दुसरी लाट आली आणि मार्चपासून पुन्हा टाळेबंदी लागली. याचा फटका गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही गंगा-जमुना या वारांगणांच्या प्रसिद्ध वस्तीला बसला. ग्राहक नसल्याने येथील महिलांची उपासमार सुरू झाली. गेल्या दहा दिवसांपासून दोन दिवसांतून एक दिवस जेवण करण्याची वेळ आली. अशा स्थितीत सोमवारी (दि. ३) काही वारांगणा लकडगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पराग कोठे यांच्याकडे आल्या आणि त्यांनी आपली व्यथा मांडली. कोठे यांनी तत्काळ यासाठी निश्चय फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच रात्रीपासून गंगा-जमुना पोलीस चौकीच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था सुरू झाली आणि टाळेबंदी संपेपर्यंत गंगा-जमुना वस्तीत त्यांना सकाळ-संध्याकाळ भोजनदान करण्याचा निश्चय झाला. या कामात संस्थेचे सचिव ॲड. पवन डिमोले, मदन अडकीने, आनंद शर्मा, अभिनव ढोबळे यांच्यासह अनेक व्यापारी सढळ हस्ते सहकार्य करीत आहेत. कोणीही उपाशी राहू नये, यासाठी ते आळीपाळीने स्वत: उपस्थित राहत आहेत.
..............