व्यापारी शुक्रवारपासून दुकाने सुरू करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:13+5:302021-04-08T04:08:13+5:30

नागपूर : राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर मंगळवारी नागपुरातील संतप्त व्यापाऱ्यांनी बैठकांचे आयोजन करीत निर्णयाचा विरोध केला आणि आपापल्या बाजारपेठांमध्ये ...

Merchants to open shops from Friday! | व्यापारी शुक्रवारपासून दुकाने सुरू करणार!

व्यापारी शुक्रवारपासून दुकाने सुरू करणार!

Next

नागपूर : राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर मंगळवारी नागपुरातील संतप्त व्यापाऱ्यांनी बैठकांचे आयोजन करीत निर्णयाचा विरोध केला आणि आपापल्या बाजारपेठांमध्ये शासनाविरुद्ध नारेबाजी केली. व्यापाऱ्यांनी निर्णयाचा निषेध केला. बुधवारी विविध बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांचे बैठकांचे सत्र सुरू होते. सीताबर्डी दुकानदार असोसिएशनने शासनाच्या निर्णयाविरुद्ध शुक्रवार, ९ एप्रिलपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील वाद आणखी चिघळणार आहे.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वारंट’ आहे. त्यामुळे संपूर्ण व्यापार लयास जाणार आहे, शिवाय होणारे आर्थिक नुकसान कधीही भरून निघणार नाही. आज इतवारी सराफा बाजार आणि कमाल चौकातील व्यापाऱ्यांसह विविध बाजारपेठांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. सीताबर्डी येथील दुकानदारांनी ९ एप्रिलपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सराफा बाजारात शांततेने विरोध प्रदर्शन

सोना-चांदी ओल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची इतवारी सराफा बाजारात बैठक झाली. व्यापाऱ्यांनी बैठकीनंतर शासनाच्या निर्णयाविरुद्ध इतवारी चौकात काळे मास्क आणि काळे कपडे घालून शांततेने विरोध प्रदर्शन केले. कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, शासनाने पूर्वी शनिवार व रविवारी कठोर प्रतिबंध लावण्याचे सुतोवाच केले होते. नंतर कठोर निर्बंधाच्या नावाखाली एकूण २५ दिवस व्यापार बंद करून लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण केली. १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. सराफांनी या सणांसाठी दागिन्यांचे ऑर्डर दिले आहेत. याशिवाय लग्नसमारंभासाठी दागिन्यांचे ऑर्डर घेतले आहेत. ते कसे पूर्ण होणार, याची चिंता आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात सराफांची दुकाने बंद राहिल्यास सराफा व्यावसायिक डबघाईस येणार आहे. यावेळी कमिटीचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, उपाध्यक्ष राजकुमार गुप्ता आणि सराफा व्यापारी उपस्थित होते.

श्रीकांत इलेक्ट्रिॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्र बिघडले आहे. दुकानदारांनी सणांसाठी मालाचा भरणा केला आहे. कंपन्या वसुलीसाठी तगादा लावत आहे. कारखाने, बांधकाम, किराणा, सेवा क्षेत्र आदी खुले आहेत. मग दुकानेच का बंद आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक होणारी एसी व कुलरची विक्री थांबली आहे. दुकानदारांकडे कोट्यवधींचा माल पडून आहे. त्याचे नुकसान व्यापाऱ्यांनाच सोसावे लागणार आहे. याउलट शासनाकडे कर भरणा आणि बँकांची व्याज वसुली थांबणार नाही.

दुकाने सुरू करण्यावर मुख्यमंत्री

दोन दिवसांत निर्णय घेणार : भरतीया

लॉकडाऊनला संपूर्ण राज्यातील व्यापाऱ्यांचा होणारा विरोध पाहता, बुधवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतीया उपस्थित होते. त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, सर्वांना एकत्रितपणे कोरोना आजाराविरुद्ध लढायचे आहे. वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू करावीत. खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात. मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. ते म्हणाले, आपल्याला सर्व मिळून एकत्रितपणे कोरोनावर मात करायची आहे. व्यापाऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर विचार करू. दोन दिवसांचा वेळ द्यावा. त्यावर उचित निर्णय घेतला जाईल.

Web Title: Merchants to open shops from Friday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.