वाहतूकदारांच्या संपाला कळमना व्यापाऱ्यांचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:05 AM2018-07-25T01:05:52+5:302018-07-25T01:08:28+5:30
वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कु मारवाह यांच्या नेतृत्वात ट्रान्सपोर्टस् कळमना बाजारात पोहचले. येथे फळ व्यापाऱ्यांनी त्यांच्या संपाला समर्थन देत दुकाने बंद ठेवली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेश छाबरानी यांनी सांगितले की, वाहतूकदारांच्या संपामुळे अन्य ठिकाणाहून येणाऱ्या फळांचे ट्रक कमी झाले आहे. त्यामुळे भाव दुप्पट झाले आहे. अनंतापूर, वारंगल, नांदेड, नाशिक, मलकापूर, करनूल, औरंगाबाद येथून मोसंबी, डाळींब, केळी, अननस आदी फळांची आवक घटली आहे.
रोजगारावर संकट
ट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर हे सुद्धा या संपाचा हिस्सा आहे. त्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कळमना बाजारात मजुरी करणाऱ्यांनाही रोजगार उपलब्ध होत नाही. टोलचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्याचा भुर्दंड सरकारच्या महसुलावर बसतो आहे. बुकिंग कार्यालयाला कुलूप लागले असून, व्यापाऱ्यांना माल बुकिंग करताना अडचणी येत आहे. येणाऱ्या काही दिवसात अशीच स्थिती राहिल्यास सामान्य माणसावर महागाईचा बोझा पडणार आहे.
आम्ही टॅक्सपेयर आहोत, गुंड बदमाश नाही
दोन दिवसांपूर्वी आम्ही मौदा येथे शांततेत आंदोलन केले. त्यावेळी आमच्यासोबत पोलीस अधिकारी होते. आम्ही कुठलाही उपद्रव केला नाही, कुणाला बाधा पोहचविली नाही. तरीसुद्धा ट्रान्सपोर्टस्वर मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही जर दोषी आहोत तर आमच्यावर कारवाई करावी, आम्ही टॅक्सपेयर्स आहोत, गुंड बदमाश नाही.
कुक्कु मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रकर्स युनिटी
बंद केली दुकाने, राहणार पूर्ण समर्थन
ट्रान्सपोर्टस्च्या संपाला आम्ही समर्थन दिले आहे. फळांची आवक कमी झाली आहे. असे असले तरी, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांचा माल खरेदी करण्यात येत आहे. परंतु संप कायम राहिल्यास, काहीच निर्णय न झाल्यास आम्ही संपाचे पूर्ण समर्थन करू.
आनंद डोंगरे, अध्यक्ष, फळ बाजार, कळमना