नागपुरात पारा १० अंशावर; गाेंदियानंतर सर्वाधिक थंडा जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 10:29 PM2022-02-12T22:29:02+5:302022-02-12T22:29:27+5:30
Nagpur News मागील दाेन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव नागपूरवर पडला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान १० अंशावर पाेहचले.
नागपूर : मागील दाेन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव नागपूरवर पडला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान १० अंशावर पाेहचले. रात्रीच्या तापमानात २४ तासात ४.४ अंशाची घसरण नाेंदविण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात रात्रीचा पारा हळूहळू वाढायला लागेल. वातावरण काेरडे असल्याने तापमानात घट झाली आहे.
वेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी नागपुरात ३.६ किमी प्रति तासाच्या वेगने दक्षिण-पूर्व दिशेला गार वारे वाहत हाेते. दिवसभर अशा वेगवान वाऱ्याचे सत्र सुरू हाेते. रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा ६ अंशाने घसरल्याने हुडहुडीवाली थंडी जाणवत हाेती. विदर्भात ९.६ अंशासह गाेंदिया सर्वाधिक थंड हाेते. याशिवाय वर्धा, ब्रह्मपुरीत ११ अंश, चंद्रपूर, वाशिममध्ये १२ अंश, बुलढाणा १२.२ अंश, गडचिराेली १२.४ अंश, अमरावती १२.७ अंश तर अकाेला व यवतमाळ १३.५ अंश किमान तापमानाची नाेंद झाली.
दाेन दिवसात ७.८ अंशाची घसरण
नागपुरात मागील दाेन दिवसात रात्रीचे तापमान ७.८ अंशाने घसरल्याची नाेंद झाली. १० फेब्रुवारीला किमान तापमान १७.८ अंश नाेंदविण्यात आले हाेते. ११ फेब्रुवारीला ते १४.४ अंशावर आले व शनिवारी तापमान १० अंशापर्यंत घसरले.