उन्हाळ्यात प्रथमच पारा ४२.७ अंशांवर; उरलेल्या दिवसांत कडक ऊन राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 09:51 PM2023-05-13T21:51:30+5:302023-05-13T21:51:58+5:30
Nagpur News या मोसमातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान शनिवारी नोंदविण्यात आले. दिवसभर उष्ण वारे वाहत होते. सकाळी आर्द्रता २७ टक्के होती, तर संध्याकाळी १६ टक्के नोंद करण्यात आली.
नागपूर : नागपुरात मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली. मात्र, अवकाळी पावसामुळे एप्रिल तापला नाही. दुसरीकडे ९ मे पासून नागपूरचे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. या मोसमातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान शनिवारी नोंदविण्यात आले. दिवसभर उष्ण वारे वाहत होते. सकाळी आर्द्रता २७ टक्के होती, तर संध्याकाळी १६ टक्के नोंद करण्यात आली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘मोचा’ हे चक्रीवादळ गेल्या २४ तासांत ताशी १९ किमी वेगाने उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे. वादळाचा मध्य भारतावर अजिबात परिणाम झालेला नाही. मात्र, वादळामुळे वातावरणातील आर्द्रता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन पारा चढू लागला आहे. बांगलादेश, म्यानमारमध्ये १४ मे रोजी वादळाचा वेग १७० ते १८० असेल. या परिस्थितीमुळे भारतात वादळाचा परिणाम झालेला नाही.
शनिवारी सकाळपासून नागपुरात आकाश पूर्णपणे निरभ्र होते. सूर्य तापत होता. दुपारी दोन ते चार या वेळेत मुख्य रस्त्यांवरील वाहतूक निम्म्याहून कमी झाली. उष्ण वारे वाहत होते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४१ अंशांच्या पुढे पोहोचला आहे. ४५.६ अंशांसह अकोला सर्वाधिक उष्ण ठरले. तर अमरावतीत ४४.६, वर्धा ४४.१, यवतमाळ ४३, चंद्रपूर ४२.४, गोंदिया-गडचिरोली ४१.६, ब्रह्मपुरी ४१.४ आणि बुलढाणा ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हिट ॲक्शन प्लॅन कुठे गेला?
एप्रिल महिन्यात महापालिका अधिकाऱ्यांनी हिट ॲक्शन प्लॅनबाबत बैठक घेतली. दरम्यान, अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये उन्हाळा जाणवला नाही. मात्र, मे महिन्यात गेल्या ५ दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या पुढे होते. असे असूनही हिट ॲक्शन प्लॅनबाबत मनपा अधिकाऱ्यांनी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. दुपारनंतरही वाहतूक सिग्नल सुरू राहतात. लोकांना नाईलाज म्हणून तिथे उभे राहावे लागते. उद्यानात पिण्याचे पाणी नाही. सावलीसाठी शेडही उभारण्यात आलेले नाहीत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने यावेळी प्याऊ सुरू केलेले नाही.