पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:26 PM2023-02-15T12:26:56+5:302023-02-15T12:27:15+5:30
दिवसा उन्हाचे चटके अन् रात्री थंडीचा गारठा
नागपूर : मध्य भारतासह विदर्भात थंडीने पुन्हा जाेर धरला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व जिल्ह्यांत रात्रीच्या पाऱ्यात पुन्हा घसरण झाली. मंगळवारी नागपुरात १०.७ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ४.८ अंशाने कमी आहे. दिवसाचा पारा मात्र चढत असून, उन्हाळा सुरू हाेत असल्याची जाणीव करून देत आहे.
दिवसा उन्हाचे चटके लागत असल्याने आता थंडी गेली, असे वाटत असले, रात्रीचा गारठा थंडी अद्याप बाकी असल्याची जाणीव करीत आहे. साेमवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात किमान तापमान चांगलेच घसरले. ही घसरण दुसऱ्या दिवशीही कायम असून, रात्री गारठा वाढला आहे. विदर्भातील गाेंदिया १०.२ अंश, यवतमाळ १०.५ अंश, अमरावती १०.४ अंश, अकाेला १०.५ अंश तापमानाची नाेंद झाली असून, या जिल्ह्यात पारा सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशांनी घसरला आहे. याशिवाय गडचिराेली ११.६ अंश, वर्धा १२ अंश व चंद्रपुरात १२.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. आणखी दाेन दिवस गारठा जाणवेल, असा अंदाज आहे.
दिवसाचा पारा मात्र सातत्याने उसळी घेत आहे. नागपूरला ३२.९ अंश कमाल तापमान नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.६ अंशांनी अधिक आहे. दुसरीकडे अकाेल्यात दिवसाचा पारा ३५.६ अंश, वाशिम ३५ अंश व अमरावतीत ३४.२ अंशांपर्यंत उसळला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसते. सकाळची आर्द्रता ५० ते ६० टक्क्यांच्या वर राहत असली, तरी सायंकाळी ३० टक्क्यांच्या खाली येत आहे.