नागपुरात पारा वाढला, उकाड्यामुळे नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:11 AM2023-04-11T11:11:16+5:302023-04-11T11:13:26+5:30
पारा दाेन दिवसांत ४० अंशांजवळ
नागपूर : ढगाळ वातावरण ओसरल्याने दिवसाचे कमाल तापमान वाढण्याचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवार, शनिवारी ३० अंशांच्या खाली गेलेला पारा दाेन दिवसांत ४० अंशांच्या जवळ पाेहोचला आहे. साेमवारी ३८.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. पारा चढला तशी उकाड्याची जाणीव व्हायला लागली आहे.
सकाळच्या वेळी काही काळ ढगांची गर्दी हाेते; पण सूर्य चढला की ढग दिसेनासे हाेतात आणि ताप वाढायला लागताे. साेमवारी सर्वाधिक पारा ब्रह्मपुरी ३८.६ अंश व वर्ध्यात ३८.५ अंश नाेंदविण्यात आला. पारा सरासरीपेक्षा थाेडा खाली असला, तरी २४ तासांत ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. दिवसासाेबत रात्रीचा पाराही वधारला आहे. नागपुरात २४ तसांत २.६ अंशांनी वाढत किमान तापमान २२.९ अंशांवर पाेहोचले आहे. चंद्रपूरला सर्वाधिक २५.४ अंश किमान तापमानाची नाेंद झाली आहे. त्यामुळे रात्रीही उष्णता वाढली आहे.
दरम्यान, रविवारी अकाेल्यात जाेरदार गारपिटीनंतर साेमवारी पावसाने उसंत घेतली. रविवारी अमरावती, ब्रह्मपुरी, वाशीम भागात किरकाेळ पावसाची नाेंद झाली. यानंतर पुढचे दाेन-तीन दिवस पावसाची शक्यता नसून पारा वाढण्याची व ४० वर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण हाेईल, असा अंदाज व्यक्त हाेत आहे.