२४ तासांत ४.९ अंशांनी घसरला पारा; वाढली हुडहुडी; गाेंदिया सर्वांत थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 09:58 PM2023-02-02T21:58:59+5:302023-02-02T21:59:22+5:30
Nagpur News गेल्या २४ तासांत किमान तापमान तब्बल ४.९ अंशांनी खाली घसरला आणि बऱ्याच दिवसांनंतर नागपूरकरांना हुडहुडी जाणवायला लागली. नागपुरात किमान तापमान १२.७ अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.७ अंशाने कमी आहे.
नागपूर : थंडी गेली की काय, असे वाटत असताना गेल्या २० दिवसांनंतर गुरुवारी पहिल्यांदा रात्रीचा पारा सरासरीच्या खाली आला. २४ तासांत किमान तापमान तब्बल ४.९ अंशांनी खाली घसरला आणि बऱ्याच दिवसांनंतर नागपूरकरांना हुडहुडी जाणवायला लागली. नागपुरात किमान तापमान १२.७ अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.७ अंशाने कमी आहे. दरम्यान १०.५ अंशावर असलेले गाेंदिया शहर सर्वांत थंड हाेते.
फेब्रुवारीचा पहिला आठवडा थंडीत जाणार असल्याचा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तविला हाेता. विशेष म्हणजे जानेवारीची ८ ते १० तारीख वगळता किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा वरच राहिले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वरच राहिले आहे. त्यामुळे मध्यरात्र ते पहाटेचा गारवा वगळता दिवसभर उकाडा जाणवायला लागला हाेता. १ फेब्रुवारीपासून पाऱ्यात घट हाेणे सुरू झाले; पण दुसऱ्याच दिवशी ताे खाली काेसळला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत किमान तापमान खाली घसरले आहे. गाेंदियात ते ५.५ अंशांनी खाली घसरले. यासह वर्ध्यात ४.१ अंश, चंद्रपूर ३.५ अंश, ब्रह्मपुरीत ते ४.५ अंशाने खाली आले. केवळ गडचिराेलीत पारा सरासरीच्या वर आहे.
मध्य प्रदेशातील थंडीच्या लाटेचा परिणाम...
उत्तर-पश्चिम राजस्थान व आसपासच्या परिसरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. बंगालच्या खाडीत दक्षिण-पश्चिमेला कमी दाबाचा पट्टा तयार हाेत असून पश्चिम हिमालय क्षेत्रात पश्चिम झंझावात तयार हाेत आहे. सध्या मध्य प्रदेशच्या भागात थंडीच्या लाटेसारखी स्थिती असून त्याचा प्रभाव विदर्भावरही जाणवत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढचे दाेन-तीन दिवस तापमान कमी राहणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे.