राज्यात पारा २ अंशाने वाढणार; नागपुरात सायंकाळी ढगांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 07:17 PM2022-03-24T19:17:14+5:302022-03-24T19:18:15+5:30
Nagpur News विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नागपूर : यावेळी सुरुवातीपासून तापणारा उन्हाळा पुढे सरकताना अधिकच तापदायक ठरत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नागपूरसह विदर्भात उष्णता व सूर्याच्या प्रकाेपापासून दिलासा मिळताना दिसत नाही. मध्ये दाेन दिवस नागपूर व काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते, पण ताप कमी झाला नाही. आता पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. गुरुवारी नागपुरात कमाल तापमान ४१ अंशाच्या आसपास पाेहोचले. हवामान विभागाने विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. त्यानुसार दुपारी ४ नंतर सूर्य काही अंशी ढगांनी झाकला हाेता, पण उष्णतेत कमतरता नव्हती. काेकणात तुरळक पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज हाेता. राजस्थानच्या आसपास वेस्टर्न डिर्स्टबन्स व मध्य महाराष्ट्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशनच्या प्रभावाने वातावरणात बदल झाला आहे.
विदर्भात ४१.६ अंशासह अकाेला, ४१.४ अंशासह अमरावती, ४१.५ अंशासह ब्रम्हपुरी व ४१ अंशासह चंद्रपूर सर्वाधिक तापलेले हाेते. वर्धा व यवतमाळमध्ये ४०.५ अंशाची नाेंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशाने अधिक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत ढगाळ वातावरणामुळे घसरलेला पारा पुन्हा वाढला. मराठवाड्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस राज्यातील सर्व भागात तापमान पुन्हा २ अंशाने वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यानंतर ते स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्यातरी सूर्याच्या प्रकाेपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.