शहरासह गावांगावात राबविणार ‘मेरी माटी – मेरा देश’ अभियान : डॉ. विपीन इटनकर
By गणेश हुड | Published: August 8, 2023 07:22 PM2023-08-08T19:22:34+5:302023-08-08T19:22:43+5:30
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता देशभरात आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने होणार आहे.
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता देशभरात आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने होणार आहे. शहरासह जिल्ह्यात गावागांवात हे अभियान ९ ते ३० ऑगस्ट या काळात राबविले जाणार आहे. जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदत केले.
अभियानादरम्यान शीलाफलकाचे लोकार्पण, पंचप्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांना नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान असा पंचसूत्री उपक्रम राबविला जाईल. गावातील दर्शनीय व महत्वाच्या ठिकाणी शिलाफलक उभारुन यावर मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्या वीरांना नमन असे नमूद असेल.
देशासाठी बलिदान देणाऱ्या गावातील शहीदांची नावे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश असेल.
यावेळी आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे उपस्थित होते.
प्रत्येक गावांत अमृतवन
वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृतवन निर्माण करण्यात येईल. वीरांना वंदन या कार्यक्रमांतर्गत गावामध्ये किंवा गावाच्या कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्यासाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येईल.
अमृत कलश यात्रा काढणार
दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. नाागपूर जिल्ह्यातून १४ तालुके आणि एक महापालिका क्षेत्र असे १५ कलश दिल्लीला पाठविले जाणार आहे.
‘हर घर तिरंगा’ मोहीम
१५ ऑगस्टला यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाला आपल्या ‘पॉकेटमनी’मधून ७५ तिरंगे देणाऱ्या अर्णव गोल्हर या विद्यार्थ्याचे कौतुकही त्यांनी केले.
एक फोटो अपलोड करा
युवकांनी या मोहिमेत सहभागी होताना ९ ते 3३० ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे सेल्फी फोटो काढावेत व ते अपलोड करावे. यामध्ये वृक्षारोपण, दिव्यांसोबतचा फोटो, तिरंगा घेतलेला फोटो अपलोड करता येईल. https://yuva.gov.in/meri_mati_mera_desh या लिंकवर आपले फोटो अपलोड करता येईल.