नागपूर विद्यापीठातील गुणवंत पदकांना मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:15 AM2018-12-11T10:15:27+5:302018-12-11T10:16:49+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे.

The meritorious medal of Nagpur University will be reduced | नागपूर विद्यापीठातील गुणवंत पदकांना मुकणार

नागपूर विद्यापीठातील गुणवंत पदकांना मुकणार

Next
ठळक मुद्देदीक्षांतमधील पदकांवर संक्रांतदीडशे पदके झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे. दानदात्यांनी सुधारित रकमेचा धनादेश देण्यास नकार दिल्यामुळे, तब्बल दीडशे सुवर्ण व रौप्य पदके कमी करण्यात आली आहेत. यामुळे मागील वर्षीपर्यंत ज्या अभ्यासक्रमांच्या गुणवंतांना सन्मानित करण्यात येत होते, यंदा त्याच अभ्यासक्रमांत पदकांचा दुष्काळ जाणवणार आहे.
विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना १०५ व्या दीक्षांत समारंभापर्यंत जवळपास ३४० पदके पारितोषिके प्रदान करण्यात येत होती. नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत होता. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली.
सुवर्णपदकांसाठी ७५ हजार तर रौप्यपदकांसाठी ५० हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. जर सुधारित धनादेश देणे शक्य नसेल तर मूळ अनामत रक्कम दानदात्यांचे कुटुंबीय घेऊन जाऊ शकतात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. विद्यापीठाने यासंबंधात दानदात्यांना पत्र पाठविले. यातील ३५ जणांनी अतिरिक्त रक्कम भरण्याची तयारी दाखविली होती, तर १७ जणांनी अनामत रक्कम परत मागितली होती. २२ जणांचा पत्ता विद्यापीठाकडे नव्हता. अनेक दानदात्यांनी २१००, २२०० रुपयांची अनामत रक्कम अनेक वर्षांअगोदर भरली होती. आता नव्या नियमांमुळे त्यांना सुवर्णपदकासाठी ७२,८०० रुपये भरावे लागले. आता १०६ व्या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने दीडशे पदके कमी केली आहेत. विद्यार्थ्यांना एकूण १९१ पदके-पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर अनुक्रमे तीन लाख व दोन लाखांची रक्कम भरल्याने सुवर्ण व रौप्य पदक यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

Web Title: The meritorious medal of Nagpur University will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.