गुणवंत विद्यार्थ्यांची धाव नामांकित महाविद्यालयांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:29 AM2019-06-27T10:29:23+5:302019-06-27T10:33:09+5:30
अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली. दहावीत ९९.२ टक्के गुण मिळवून विदर्भात प्रथम आलेल्या मैत्रेयी घनोटे हिने डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये फिशरीत प्रवेश मिळविला आहे. तर शहरातून गुणवत्ता यादीत आलेल्या अनुजा सहस्रबुद्धे हिने सुद्धा आंबेडकर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविला आहे. यावषीर्ही नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ ९७ टक्क्यावर गेला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे ८ जून रोजी निकाल जाहीर केला. त्यापूर्वीच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. मात्र यंदा दहावीच्या निकालात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच ९० टक्क्यांच्यावर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे यंदा द्विलक्षी अभ्यासक्रमाचा कट ऑफमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत द्विलक्षीचे प्रवेशासाठी मंगळवारी २ हजार ७८६ विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली. यापैकी ८२४ विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केले. यात शहरातील नामवंत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. यावर्षी या महाविद्यालयांमध्ये ९८.४ टक्क्यापासून सुरू होऊन ९७.६० टक्क्यावर आले आहे. यामध्ये इलेक्ट्रानिक्स, फिशरीज आणि कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून आली. तर शिवाजी महाविद्यालयात असलेल्या ५० अनुदानित तुकडीसाठी ९७ टक्क्यांपर्यत कट ऑफ आला आहे. याच अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा कट ऑफ ९७.६ टक्क्यांवर असून कॉम्प्युटर सायन्समध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ ९६.६ टक्क्यांवर आहे.
२५ हजारावर विद्यार्थ्यांनी भरला भाग -२
अकरावी प्रवेशाची प्रक्रिया निकालापूर्वीच सुरू झाली होती. १ जूनपासून विद्यार्थ्यांना भाग-१ भरायचे होते आणि निकालानंतर भाग-२ ची प्रक्रिया करायची होती. आतापर्यंत भाग-१ साठी ३३,९४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे, तर भाग-२ साठी २५,७६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १५,४५० अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. तर वाणिज्यचे अर्ज ७,७४६, कला शाखेसाठी १८७७, एमसीव्हीसीसाठी २९५ व बायोफोकलसाठी ४,३८६ अर्ज आले आहेत.