भिंतीचित्रातून स्वच्छ, सुंदर शहराचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:53+5:302021-02-05T04:38:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबोरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बुटीबोरी नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छ व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बुटीबोरी नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत सायकल रॅली, नदीकाठावरील स्वच्छता, रांगाेळी स्पर्धेच्या आयाेजनानंतर भित्तिचित्र स्पर्धेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेत सर्वच वयाेगटांतील स्पर्धक नागरिकांनी सहभाग नाेंदवून स्वच्छ व सुंदर शहराचा संदेश दिला.
स्पर्धकांनी कुंचल्यातून भिंतीवर सप्तरंगांचा साज चढवीत ओला व सुका कचरा वर्गीकरण, हागणदारीमुक्त शहर, माझी वसुंधरा, प्लास्टिक वापरावर बंदी, जलसंवर्धन तसेच स्वच्छ व सुंदर बुटीबोरी, आदी विषयांवर भित्तिचित्र रेखाटून स्वच्छ व सुंदर शहर राखण्यासाठी नागरिकांना संदेश दिला.
बुटीबोरी शहरात प्रभागनिहाय स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शहरातील ओस पडलेल्या भिंतींवर चित्रे काढून शहराच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. नगर परिषदेने ओस पडलेल्या भिंतींना व्हाईटवाॅश करून दिले. त्यावर स्पर्धकांनी रंगाच्या कुंचल्यातून सप्तरंगानी चित्र रेखाटले.
या स्पर्धेतील कलावंतांच्या चित्रांचे सर्वेक्षण नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, सभापती मंदार वानखेडे, सत्तापक्ष नेता मुन्ना जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, आदींनी केले असून, विजेत्या स्पर्धकांना १ फेब्रुवारीला पुरस्कार दिला जाईल.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार राेख १० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार राेख सात हजार रुपये, तृतीय पुरस्कार राेख पाच हजार रुपये तसेच एक हजार रुपयाचे प्रत्येकी पाच प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.