ज्येष्ठ नागरिकांनी दिला वन्यजीव संवर्धनाचा संदेश
By admin | Published: February 9, 2016 03:00 AM2016-02-09T03:00:06+5:302016-02-09T03:00:06+5:30
राज्यातील वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या सायकल रॅलीचा सोमवारी सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात समारोप करण्यात आला.
७५० किलोमीटरची सायकल रॅली : वन सभागृहात समारोप
नागपूर : राज्यातील वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या सायकल रॅलीचा सोमवारी सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे, ५० ते ६५ वयोगटातील या ज्येष्ठ नागरिकांच्या सायकल रॅलीने वर्धा, यवतमाळ, वणी, ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोली, नवेगाव, नागझिरा, भंडारा व पेंच असा ७५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ती रॅली सोमवारी नागपुरात पोहोचली. दरम्यान, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री श्री भगवान यांनी रॅलीतील ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महिप गुप्ता व उपसंचालक किशोर मिश्रीकोटकोर उपस्थित होते.
रॅलीमध्ये विजय हिंगे, अविनाश मेडेकर, हेमंत थिंगळे, दत्तात्रय गोखले, पद्माकर आगाशे, माणिक पवार, सतीश रेंगे, अरविंद चितळे व लहू यांचा समावेश होता. यावेळी पीसीसीएफ भगवान यांनी मार्गदर्शन करताना वन विभागाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची गरज असल्याचे सांगितले. वन विभाग लोकसहभागातून वन आणि वन्यजीव संवर्धन करीत आहे. नवनवीन योजना आखून त्या यशस्वीरीत्या राबविण्यावर भर दिला जात आहे. यात ज्येष्ठ नागरिकांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती केली आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महिप गुप्ता यांनी नवीन उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे काम केले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)