विदर्भात पुढचे तीन दिवस पावसासह गारपीट, हवामान खात्याचा येलो अलर्ट
By निशांत वानखेडे | Published: February 24, 2024 07:15 PM2024-02-24T19:15:19+5:302024-02-24T19:15:39+5:30
गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती.
नागपूर : रविवारपासून पुढचे पाच दिवस म्हणजे २९ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस वीजा व गडगडाटीसह होणाऱ्या पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या ५ जिल्ह्यात ही तीव्रता अधिक राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असा इशारा विभागाने दिला आहे.
गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला व संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता. या पावसानंतर मात्र ऊन वाढत गेले. नागपूरसह बहुतेक जिल्ह्यात पारा ३५ ते ३६ अंशापर्यंत पोहोचला आहे. मात्र आता फेब्रुवारीचा शेवटचा संपूर्ण आठवडा ढगाळ व पावसाळी वातावरणात जाणार अशी स्थिती तयार झाली आहे. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती आहे. गारपीट होण्याचा अंदाज असल्याने संत्रा, मोसंबी व आंब्याचा बहार गळण्याची भीती आहे. वेचणी व्हायची असल्याने शेतातील कपाशीचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढलेल्या पिकांचे योग्य व्यवस्था करावी, झालेल्या पिकाची कापणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
विदर्भाशिवाय मुंबई, कोकण वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागात ढगाळ वातावरण, वादळ व तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. पावसामुळे विदर्भात कमाल व किमान तापमानात घसरण होण्याची व थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारीही सकाळपासून आकाश काहीसे ढगांनी व्यापले होते. त्यामुळे नागपुरात कमाल तापमान ३१.८ अंशावर आले. इतरही जिल्ह्यात पारा काही अंशी घटला आहे. रात्रीच्या किमान तापमानाही घट झाली आहे. पुढचे दिवस ढगाळ वातावरणात जाणार असल्याने थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.