महामेट्रोतर्फे त्रिमूर्तीनगर उद्यानात मेट्रो संवाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:27+5:302020-11-29T04:04:27+5:30
नागरिकांना दिली माहिती : नागरिकांनी केली फिडर सर्व्हिसची मागणी नागपूर : त्रिमूर्तीनगर उद्यानात नागरिक मोठ्या संख्येने योगासन, व्यायाम करण्यासाठी ...
नागरिकांना दिली माहिती : नागरिकांनी केली फिडर सर्व्हिसची मागणी
नागपूर : त्रिमूर्तीनगर उद्यानात नागरिक मोठ्या संख्येने योगासन, व्यायाम करण्यासाठी येतात. त्यामुळे महामेट्रोच्या वतीने त्रिमूर्तीनगर उद्यानात सकाळी ६ वाजता मेट्रो संवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना मेट्रोविषयी माहिती देऊन मेट्रोचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माझी मेट्रोबद्दल प्राथमिक माहिती दिली. त्रिमूर्तीनगर परिसरापासून जवळचे मेट्रो स्टेशन कोणते आहे, मेट्रोमध्ये सायकल सोबत नेण्याची सुविधा, महाकार्ड याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन ऑन व्हील्स, फिडर सेवा आदी सुविधांबाबत यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरणपूरक परिवहन साधनांचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहन दिले. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करण्यात आले. त्रिमूर्तीनगर भागातून फिडर सर्व्हिस सेवा वासुदेवनगर तसेच सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली. त्रिमूर्तीनगर भागातून नागरिक मोठ्या संख्येने सीताबर्डी, वर्धा मार्ग तसेच हिंगणा येथे ये-जा करतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मेट्रोशी जोडण्यासाठी या मेट्रो संवादचे आयोजन करण्यात आले होते.
...........