नागपुरातील ‘मेट्रो डबलडेकर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:13 AM2018-08-25T10:13:56+5:302018-08-25T10:14:29+5:30
वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. पण आता फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही.
आनंद शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. हा पूल गड्डीगोदाम रेल्वे पुलाजवळ ट्रिपलडेकर दिसून येणार आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. त्याची प्रत झोन मुख्यालयाला पाठविली आहे. या कालावधीत फाईलला मंजुरी तर सोडाच, पण आता तर फाईल कुठे आहे, याचाही पत्ता नाही.
मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार मंडळाने फाईल महामेट्रोकडे काही सूचनांसाठी परत पाठविली तर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मत आहे की, रेल्वेकडून लवकरच ट्रिपलडेकर पूल निर्मितीसाठी मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे फाईल महामेट्रोकडे नसल्याचे यावरून स्पष्ट होते.मध्य रेल्वेचे स्वतंत्ररीत्या कार्यरत बांधकाम विभागाच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे फाईल नसल्याचे सांगत आहेत.
अशा परिस्थितीमुळे गड्डीगोदाम रेल्वे पूल परिसरात मेट्रोचा डबलडेकर पुलाचे काम अडकण्याची शंका आहे. जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगच्या फाईलला रेल्वेकडून हिरवी झेंडी मिळेपर्यंत डबलडेकर मेट्रो पुलाची निर्मिती अशक्य आहे. या प्रकरणी महामेट्रो आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य ब्रिज इंजिनिअरनी जागेची पाहणी करून फाईलमध्ये काही संशोधन करण्यासाठी महामेट्रोकडे परत पाठविली होती. त्यानंतर महामेट्रोने नवीन संशोधनाची जीएडी फाईल पुन्हा मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडे पाठविली होती.
या फाईलवर डीआरएम आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर मंजुरीसाठी प्रधान मुख्य अभियंत्यांकडे (बांधकाम) पाठविली जाईल. सध्या ही फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही. यामुळे जीएडी फाईलला मंजुरी मिळण्यास वेळ लागल्यास डबलडेकर पुलाच्या बांधकामाला उशीर होण्याची शक्यता आहे.
मेट्रोची कोणतीही फाईल ‘पेंडिंग’ नाही
नागपूर मेट्रोच्या डबलडेकर पुलासंबंधी कोणतीही फाईल माझ्या कार्यालयात पेंडिंग नाही.
- संतोष कुमार, प्रधान मुख्य अभिंयंते (बांधकाम), मध्य रेल्वे, मुंबई.
मध्य रेल्वेने महामेट्रोला दिली फाईल
महामेट्रोने १५ दिवसांपूर्वी संशोधित जीएडी फाईल मध्य रेल्वेला दिली होती. त्याला बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले होते. या विभागाने काही संशोधन सुचविले होते. त्यानंतर ही फाईल दोन दिवसांपूर्वी महामेट्रोला परत दिली आहे.
- के.के. मिश्रा, वरिष्ठ डीसीएम,
मध्य रेल्वे, नागपूर मंडळ.
मंजुरीच्या प्रतीक्षेत महामेट्रो
महामेट्रोने मध्य रेल्वेला जीएडी फाईल सोपविली आहे. त्यात काही संशोधन आणि सूचना केल्या होत्या. संशोधनासह जीएडी फाईल पुन्हा मध्य रेल्वेकडे सोपविली आहे. या फाईलला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
- अखिलेश हळवे,
डीजीएम (सीसी), महामेट्रो.