नागपुरात मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा झुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:26 PM2018-08-28T21:26:23+5:302018-08-28T21:28:22+5:30
मुंजे चौकातून जानकी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा रस्त्यावर झुकल्यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आणि सळाखी उभ्या केल्या. ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंजे चौकातून जानकी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा रस्त्यावर झुकल्यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आणि सळाखी उभ्या केल्या. ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.
मेट्रो रेल्वेच्या पूर्व-पश्चिम मार्गावर मुंजे चौकात बहुमजली इंटरचेंज स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. त्याकरिता पिलर उभारणीसाठी सळाखींची जोडणी करण्याचे काम सुरू होते. पण या सळाखींना एक बाजूला आधार नव्हता. त्यामुळे सळाखींचा तोल एका बाजूला गेला होता. याची सूचना एका नागरिकाने मेट्रोच्या नियंत्रण कक्षाला दिली. याची गंभीर दखल घेत महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने या सळाखींना आधार देण्यात आला. सुरक्षेच्या कारणांनी या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
सहा महिन्यांपूर्वी याच मार्गावर पिलरच्या सळाखींचा ढाचा आधाराअभावी रस्त्यावर कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. त्या तुलनेत यावेळी ढाचा अल्पसा वाकला होता. बांधकामादरम्यान सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.