उत्तम आरोग्य आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार मेट्रो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:16 AM2018-02-18T00:16:53+5:302018-02-18T00:18:26+5:30
मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे केले.
महामेट्रो आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचा तिसरा वर्धापनदिन समारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी दीक्षित बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेषज्ञांनी मत मांडले आणि मेट्रोचे फायदे सांगितले. उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, समाजसेवक दिनेश नायडू, महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ६० टक्के काम तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. रेल्वे जमिनीवरून व्यावसायिकरीत्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रकल्पात केवळ २७ महिन्यात ट्रायल रन करून देशातील मेट्रो रेल्वेत इतिहास रचला आहे. पहिल्या टप्प्यात दररोज ३.५० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांसह एकूण ५.५० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. त्यांना फीडर सेवेने जोडले जाईल.
दुसºया सत्रात मेट्रो रेल्वेचे फायदे, या विषयावर समूह चर्चा झाली. चर्चेत महापौर नंदा जिचकार, वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रशांत जगताप, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वरिष्ठ पत्रकार आलोक तिवारी, आर्किटेक्ट अवंतिका चिटणवीस उपस्थित होते. जिचकार यांनी रस्त्यांवरील अपघात कमी होऊन पर्यावरणाची सुरक्षा होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होईल. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना पायदळ चालावे लागेल. त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब, तणाव, हृदयविकार, मधुमेह यासारख्या व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. आलोक तिवारी यांनी वेगवान प्रकल्पाची प्रशंसा केली. प्रकल्प व्यावहारिक बनावा. डॉ. सतीश वटे यांनी प्रकल्पामुळे वायू प्रदूषण कमी होईल, असे सांगितले. डॉ. अतुल पांडे यांनी प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मांडले. अवंतिका चिटणवीस यांनी मेट्रो प्रकल्पात लोकांना जोडण्याचे आवाहन केले. संचालन योगेश देशपांडे आणि आभार महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी मानले.
यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.