मेट्रो रेल्वे हिंगणा मार्गावरही धावण्याकरिता सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:32 PM2019-12-23T22:32:24+5:302019-12-23T22:37:13+5:30
नागपूर मेट्रोच्या रिच-३ (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) अॅक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रोच्या रिच-३ (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) अॅक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे. या मार्गावर प्रवासी सेवेच्या दृष्टीने सर्व आवश्यक कार्य आणि ५ स्टेशनचे कार्य देखील महा मेट्रोने पूर्ण केले आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या हिंगणा मार्गावरील (रिच ३ अॅक्वा लाईन) कार्याचे परीक्षण करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग आणि पथक सोमवारी नागपूरला पोहचले. गर्ग यांनी या दौऱ्यात हिंगणा मार्गावर ट्रॉलीच्या साहाय्याने ट्रॅक व ओएचई व इतर आवश्यक बाबींची पाहणी केली यात प्रामुख्याने कम्युनिनिकेशन बेस्ड सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल सिस्टमच्या (सीबीटीसी),आटोमेटीक ट्रेन प्रोटेक्शन, ऑटोमेटीक ट्रेन सुपरविजनचे परीक्षण करण्यात आले. वेगवेगळ्या टप्यामध्ये हे निरीक्षण होत असून त्याच अंतर्गत आज हे निरीक्षण करण्यात आले. सीताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात येथील रहिवाश्याना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय या मार्गावर असलेल्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल, शाळा/महाविद्यालय आणि व्यावसायिक दुकानांमध्ये येणाऱ्यांसाठी मेट्रो सेवा उपयुक्त ठरणार आहे.
रिच-३ लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज अश्या ११ कि.मी.अंतराचे प्रवास प्रवाश्यांना आनंददायी ठरणार आहे. रिच- ३ आणि रिच- ४ या मार्गिकेला अॅक्वा लाईन असे नाव देण्यात आले असून नैसर्गिक सौंदर्याचा प्रवास या मार्गिकेवर बघायला मिळणार आहे. अॅक्वा लाईन मार्गिकेचा प्लॅटफॉर्म सीताबर्डी इंटरचेंज येथील तिसऱ्या माळ्यावर राहणार आहे. सदर मार्गावर झासी राणी चौक, इंस्टीट्युट ऑफ इंजिनियर्स, सुभाष नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्थानकांचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.
या पाहणी दरम्यान संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, कार्यकारी संचालक (रिच-३) अरुण कुमार, कार्यकारी संंचालक (ट्रॅक) नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (ओएचई) गिरधारी पौनीकर, कार्यकारी संचालक (सिग्नलिंग) डेहरीया, कार्यकारी संचालक(ईलेव्कट्रीकल) राजेश पाटील, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) राजेश कुमार पटेल, महाव्यवस्थापक (ओ अँड एम) सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ओएचई) नामदेव रबडे आदीउपस्थित होते.