मेट्रो रेल्वे आॅटोरिक्षासाठी वरदान ठरणार
By admin | Published: March 29, 2015 02:30 AM2015-03-29T02:30:43+5:302015-03-29T02:30:43+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे नागपुरातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि आॅटोरिक्षासह अन्य वाहतुकीच्या साधनांना लाभ मिळेल, ..
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे नागपुरातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि आॅटोरिक्षासह अन्य वाहतुकीच्या साधनांना लाभ मिळेल, असे आश्वासन फ्रान्स सरकारच्या विकास कंपनीचे (एएफसी) अधिकारी आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी आॅटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
फ्रान्सच्या चमूने तीन दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मेट्रो रेल्वेच्या दोन्ही कॅरिडोरची पाहणी केली आणि आॅटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी फ्रान्सच्या विकास कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर, कार्यक्रम अधिकारी शेख दिया आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, महाव्यवस्थापक आनंद कुमार, उपमहाव्यवस्थापक राजीव येल्कावार आणि आॅटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष विलास भालेराव उपस्थित होते.
चमूचे अधिकारी म्हणाले, खासगी वाहनाचा उपयोग करणारे मेट्रो रेल्वेतून प्रवास करतील. मेट्रो स्टेशनपासून घरी जाण्यासाठी ते आॅटो वा अन्य वाहतूक साधनांचा उपयोग करतील. यामुळे आॅटोला निरंतर प्रवासी मिळतील. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मेट्रो रेल्वे प्रकल्पाची विस्तृत माहिती देण्यात आली.
विलास भालेराव म्हणाले, शहरात विना परमीटचे आॅटो धावत आहेत. त्यावर नियंत्रणाची गरज आहे. प्रकल्पाच्या मदतीसाठी तयार आहोत.
कर्जासाठी चमूचा होकार
तीन दिवसीय दौऱ्यात फ्रान्सच्या चमू प्रकल्पाच्या तयारीवर समाधानी होती. या प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये कर्जस्वरूपात देण्याची त्यांची तयारी आहे. चमू दौऱ्याचा अहवाल एएफडीला लवकरच सोपविणार आहे. त्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)