मेट्रो रेल्वेमुळे उद्योजकांना फायदा होणार

By admin | Published: August 13, 2015 03:41 AM2015-08-13T03:41:04+5:302015-08-13T03:41:04+5:30

परिवर्तन व जीवनशैली सुधारणार : व्हीआयएच्या संवाद कार्यक्रमात बृजेश दीक्षित यांची माहिती

Metro railways will benefit the entrepreneurs | मेट्रो रेल्वेमुळे उद्योजकांना फायदा होणार

मेट्रो रेल्वेमुळे उद्योजकांना फायदा होणार

Next

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर नागपुरात परिवर्तन घडून येण्यासह लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत निश्चितच सुधारणा होणार आहे.
हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल आणि स्थानिक उद्योजकांसाठी कामाच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) एकॉनॉमिक व फायनान्स फोरमच्या वतीने बुधवारी उद्योग भवनातील सभागृहात ‘नागपूर मेट्रोमुळे नागपुरात परिवर्तन आणि स्थानिक उद्योजकांना संधी’ या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून दीक्षित बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उपाध्यक्ष अनिल पारेख, सचिव रोहित अग्रवाल, व्हीआयएच्या एकॉनॉमिक व फायनान्स फोरमचे चेअरमन ओ.एस. बागडिया, आशिष बुधे आणि ‘एनएमआरसीएल’चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर होते. (प्रतिनिधी)
८६८० कोटींची गुंतवणूक
बृजेश दीक्षित म्हणाले, केंद्र सरकार, राज्य सरकार, मनपा आणि नासुप्रचा सहभाग असलेला हा प्रकल्प ८,६८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. रस्त्याच्या मध्य भागात उभारण्यात येत असल्यामुळे जमीन अधिग्रहणासाठी अडथळा येणार नाही. प्रकल्पासाठी ८७ हेक्टर जमिनीची गरज असून, त्यापैकी ७५ हेक्टर जमीन पूर्वीच मिळाली आहे, शिवाय कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे फ्रान्स, युरोपियन युनियन आणि जर्मनी या देशातील बँकांनी प्रकल्पासाठी कर्ज देण्याची तयारी दाखविली आहे. एकूण प्रकल्पाच्या किमतीपैकी ४,५०० कोटींचे कर्ज उपरोक्त बँकांकडून मिळेल, असा विश्वास आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. हा प्रकल्प हिंगणा व मिहान या परिसरापर्यंत जाणार आहे. निविदेद्वारे मेट्रो रेल्वेच्या कामाचा अनुभव असलेल्यांना काम मिळेल, पण छोटी-मोठी कामे स्थानिक कंपन्यांना निश्चितच मिळेल. यासाठी कंपन्यांना गुणवत्तेवर भर द्यावा लागेल. मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या वेळात तब्बल दीड तासांची बचत होणार आहे. त्यामुळे त्यांची क्षमता वाढेल.
मुंजे चौक आयकॉनिक ठरणार
डॉ. सुमंत देऊळकर यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले की, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेचे क्रॉसिंग सीताबर्डी येथील मुंजे चौकात राहणार आहे. या चौकात जमिनीपासून २० मीटर उंच टॉवर आणि स्टेशन बांधण्यात येणार आहे. तिथे अत्याधुनिक सुविधा राहणार असल्यामुळे मुुंजे चौक नागपूरचे आयकॉन ठरेल. या चौकाचे डिझाईन तयार करण्यासाठी आयोजित स्पर्धेत जागतिक दर्जाच्या २४ कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यातून काही कंपन्यांची डिझाईन तयार करण्यासाठी निवड करण्यात येणार आहे.

Web Title: Metro railways will benefit the entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.