रशियन रुळावरून धावणार मेट्रो
By admin | Published: May 2, 2017 01:30 AM2017-05-02T01:30:13+5:302017-05-02T01:30:13+5:30
शहरातील मेट्रो प्रोजेक्टअंतर्गत पीलर व मेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्यासोबतच रेल्वे रुळ टाकण्याचेही काम वेगाने सुरू झाले आहे.
४० किलोमीटरचा मार्ग : १५ मेपर्यंत १० हजार टनाचे रुळ पोहोचणार
आनंद शर्मा नागपूर
शहरातील मेट्रो प्रोजेक्टअंतर्गत पीलर व मेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्यासोबतच रेल्वे रुळ टाकण्याचेही काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने रशिया येथील एका कंपनीला मेट्रोचे रुळ पुरवठा करण्याचा कंत्राट दिला आहे. त्यानुसार पुढील १२ ते १५ मेपर्यंत ४० किलो मीटरच्या मेट्रो मार्गासाठी रशिया येथून १० हजार टन रेल्वे रुळ नागपुरात पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार भविष्यात नागपूरची मेट्रो रेल्वे ही अत्याधुनिक रशियन रुळावरून धावणार आहे.
महामेट्रोच्या अधिकारी सूत्रानुसार मेट्रोच्या हिंगणा आणि मिहान येथील डेपोसह उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम कॅरिडोरसाठी सुमारे ४० किलोमीटर लांब रुळांची गरज आहे. रेल्वेच्या तांत्रिकी भाषेत या रुळांना ‘रेल’ म्हटल्या जाते. या ४० किलोमीटरच्या मार्गापैकी विमानतळ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत ५.६ किलोमीटरच्या अपग्रेड सेक्शनमध्ये रुळांना गिट्टीच्यावर सिमेंटच्या स्लीपरसोबत जोडले जाणार आहे. याशिवाय उर्वरित ३५ किलोमीटरच्या मार्गावर स्लॅब तयार करून त्यावर रुळ बसविले जाईल. नागपूर मेट्रो ही ९० किलोमीटरच्या वेगाने धावणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी रशिया येथील अत्याधुनिक रुळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतात मेट्रोचे रुळ तयार होत नाही
भारतात अजूनपर्यंत मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी लागणारे रुळ तयार केले जात नाही. त्यामुळे देशातील मेट्रो प्रोजेक्टसाठी जपान, आॅस्ट्रिया किंवा रशिया या देशाकडून ते आयात करावे लागतात. भारतीय रेल्वेसुद्धा आता या रुळांचा उपयोग करण्यासंबंधी विचार करू लागली आहे.
काय आहे वैशिष्ट्य
रशियावरून येणाऱ्या या रुळांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या रुळांच्या वरचा भाग फार मजबूत असतो. यामुळे मेट्रो धावताना रुळ आणि रेल्वेच्या चाकामध्ये अधिक घर्षण होत नाही. यामुळे रुळ आणि रेल्वेच्या देखभालीवरील खर्च कमी होतो. उन्हाळा आणि थंडीचा सुद्धा या रुळांवर काहीही परिणाम होत नाही.
पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई पोहचणार
नागपूर मेट्रो रेल्वेसाठी रशियावरून येत असलेले रुळ पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यानंतर ते रुळ नागपुरात आणले जाईल. मात्र त्यासाठी १२ ते १५ मेपर्यंतचा वेळ लागणार आहे.