हिंगणा मार्गावरील मेट्रोसेवा मंगळवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:24 PM2020-01-27T22:24:21+5:302020-01-27T22:28:36+5:30
‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. मंगळवारी सुभाषनगर मेट्रो स्थानकावर सकाळी १०.१५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवतील, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी हे देखील या कार्यक्रमात ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून सहभागी होतील. याशिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खा.विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सीताबर्डी ते लोकमान्यनगर २० रुपयात प्रवास
उद्घाटन सोहळा पार पडल्यावर प्रवासी सेवा सुरू होणार असून, या मार्गिकेवरील स्थानकांवर दर ३० मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेकरिता सज्ज असेल. दररोज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नियमित सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किंवा वासुदेवनगरपर्यंत केवळ २० रुपये लागतील. तसेच सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये लागतील. लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे.
५० महिन्यात २५ किमी मेट्रोचे बांधकाम
नागपूरच्या मेट्रोचे काम ज्या गतीने सुरू आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. ५० महिन्यात २५ किलोमीटर मेट्रो लाईनचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. सिव्हील लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली.