डिसेंबरपर्यंत रिच-२ मार्गावर मेट्रो सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:52+5:302021-07-24T04:06:52+5:30
नागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक (रिच-२) कॅरिडोर अंतर्गत व्हायाडक्टचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून कामठी ...
नागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक (रिच-२) कॅरिडोर अंतर्गत व्हायाडक्टचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून कामठी महामार्गावर मेट्रो रेल्वे व्हायाडक्ट आणि स्टेशनच्या बांधकामासोबतच डबलडेकर उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावर डिसेंबर अखेरीस मेट्रो धावणार आहे.
रिच-२ महत्त्वाचा भाग असून मेट्रो सेवेमुळे उत्तर नागपुरातील नागरिकांना फायदा होणार आहे. या मार्गावर झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. महामेट्रो झिरो माईल्स फ्रीडम पार्क व कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशनवर वाणिज्यिक परिसर तयार होत असून नागरिक मेट्रोचा उपयोग करून या ठिकाणी पोहोचू शकतील.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच मिळणार मंजुरी
नागपूर मेट्रो टप्पा-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान (कामठी मार्गे) विस्तार होईल. या ठिकाणी मेट्रो सेवा सुरू झाल्यास लाखो नागरिक आरामदायक प्रवास मेट्रोने करू शकतील.
आतापर्यंत झालेली कामे :
पायलिंग १६८२ पैकी १६८२, पाईल कॅप २२१ पैकी २२१, पियर २२१ पैकी २२१, पियर कॅप २२१ पैकी २२१, सेग्मेंट कास्टिंग २३२० पैकी २३२०, स्पॅन इरेक्शन २२२ पैकी २०६, पियर आर्म (एनएचएआय लेव्हल) ३३ पैकी ३३, पियर आर्म (मेट्रो लेव्हल) ३३ पैकी ३३ झाले असून रेल्वे स्पॅन फाऊंडेशन, बांधकाम, पेटिंग व स्टेशनची इतर कामे वेगात सुरू आहेत.