‘आरडीएसओ’ मंजुरीनंतर मेट्रोची चाचणी
By admin | Published: February 13, 2017 02:35 AM2017-02-13T02:35:09+5:302017-02-13T02:35:09+5:30
नागपूर मेट्रो रेल्वेचे काम शहराच्या विविध भागात वेगात सुरू आहे. अॅटग्रेड सेक्शन अर्थात जमिनीवरून
चिनी रेल्वे येण्यास एक वर्ष लागणार : चेन्नई व हैदराबाद येथून रेल्वे मागविणार
आनंद शर्मा नागपूर
नागपूर मेट्रो रेल्वेचे काम शहराच्या विविध भागात वेगात सुरू आहे. अॅटग्रेड सेक्शन अर्थात जमिनीवरून ५.६ कि़मी. अंतरावर रेल्वे धावण्यासाठी गिट्टीकरण, स्लीपर आणि विजेचे काम सुरू आहे. जूननंतर ट्रॅक तयार झाल्यानंतर अॅटग्रेड सेक्शनमध्ये मेट्रो रेल्वेची चाचणी होणार आहे. पण ही चाचणी रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) मंजुरीनंतर शक्य आहे.
‘आरडीएसओ’ भारतीय रेल्वेचा एक भाग आहे. त्याचे मुख्यालय लखनौ येथे आहे. ‘आरडीएसओ’मध्ये मेट्रो रेल्वेशी संबंधित ‘अर्बन ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायस्पीड डायरेक्टरेट’सुद्धा आहे. सर्व ‘डायरेक्टरेट’च्या मंजुरीनंतरच नागपुरात मेट्रो रेल्चेची चाचणी शक्य आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास ‘आरडीएसओ’कडून सुरक्षा प्रमाणपत्र आणि तांत्रिक परवाना घेण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला आवश्यक प्रक्रिया पार पाडावी लागेल. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेची चाचणी जूननंतर घेण्यात येऊ शकते. त्याच्या मंजुरीसाठी ‘आरडीएसओ’कडून मेट्रो रेल्वे, ट्रॅक, सिग्नल, ओएचई आणि अन्य संबंधित तांत्रिक कार्याची तपासणी केली जाते. त्यानंतर ‘आरडीएसओ’तर्फे सुरक्षा प्रमाणपत्र आणि तांत्रिक परवाना दिला जातो. रेल्वे चाचणीसाठी अस्थायी स्वरूपात अन्य मेट्रो प्रकल्पातील मेट्रो रेल्वे नागपुरात आणण्यात येणार आहे.
त्यांनी सांगितले की, नागपूर मेट्रोला नियमित रेल्वे चीन रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशनकडून मिळणार आहे. त्याला एक वर्ष लागणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी तीन कोचच्या २३ मेट्रो रेल्वेची आवश्यकता आहे. त्याची आॅर्डर चीन रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशनला १६ आॅक्टोबर २०१६ ला दिली आहे. ही कंपनी बुटीबोरी येथे मेट्रो रेल्वे कोच कारखाना उभारणार आहे. यासाठी राज्य सरकारसोबत सीआरआरसीचा करार १६ आॅक्टोबर २०१६ ला झाला आहे.
चेन्नई-हैदराबाद येथून येणार रेल्वे
माथूर म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वेच्या चाचणीसाठी चेन्नई आणि हैदराबादच्या मेट्रो प्रकल्पातून मागविण्यात येणारी मेट्रो रेल्वे अस्थायी स्वरुपात नागपुरात आणण्यात येणार आहे. यासाठी चेन्नई मेट्रो आणि हैदराबाद मेट्रोसोबत एनएमआरसीएलचा करार झाला आहे. पण ‘आरडीएसओ’च्या मंजुरीनंतर चाचणी शक्य आहे.