मेट्रो रेल्वेची प्रायोगिक चाचणी १५ आॅगस्टला?
By admin | Published: July 12, 2017 02:48 AM2017-07-12T02:48:40+5:302017-07-12T02:48:40+5:30
विमानतळ मेट्रो स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत ५.६ कि़मी. अंतरावर जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रायोगिक चाचणी
५.६ कि़मी.चे काम अंतिम टप्प्यात : १० दिवसांत डबे येणार
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानतळ मेट्रो स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत ५.६ कि़मी. अंतरावर जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रायोगिक चाचणी १५ आॅगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हैदराबाद येथून तीन कोचचे दोन सेट
या मार्गावर रुळ आणि विजेचे काम अंतिम टप्प्यात असून दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे. यासह चाचणीसाठी दहा दिवसात हैदराबाद येथून तीन कोचचे दोन सेट येणार आहे. चाचणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. चाचणी महिनाभर सुरू राहणार आहे. त्या दरम्यान त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार आहे.
कशी राहणार प्रायोगिक चाचणी
सुरक्षेसंदर्भातील विविध बाबी तपासून पाहण्यासाठी प्रवाशांच्या सरासरी वजनाएवढेच रेतीची पोती भरून मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेचा उपक्रम ‘रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन’ (आरडीएसओ) आणि ‘कमिश्नर आॅफर रेल्वे सेफ्टी’च्या (सीआरएस) सुरक्षेच्या मानकावर चाचणी खरी उतरल्यानंतरच मेट्रोमध्ये प्रवाशांना नियमित प्रवास करण्याची परवानगी राहील. प्रायोगिक चाचणी कमी आणि जास्त वेगात दोन्ही मार्गावर घेण्यात येणार आहे. अशी चाचणी अनेकदा घेतल्यानंतर अहवाल तयार करण्यात येणार आहे.
चाचणीनंतर व्यावसायिक फेऱ्या
मेट्रो रेल्वेच्या चाचणीदरम्यान शिवणगाव मार्गावर सहा महिन्यांसाठी तात्पुरते स्टेशन उभारण्यात येणार आहे. चाचणी संपल्यानंतर पाच व्यावसायिक फेऱ्या सुरू होतील. मेट्रो रेल्वेसाठी चीनची कंपनी कोच तयार करणार आहे. रुळ टाकण्यासह विजेचे काम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तोपर्यंत वाट न पाहता हैदराबाद येथून भाड्याने आणलेल्या कोचद्वारे प्रायोगिक चाचणी होणार आहे. इंजिन व डबे अखंड राहतील. स्वयंचलित यंत्रणेने गाडीचे नियंत्रण करण्यात येणार आहे. गाडी केव्हा धावेल किंवा केव्हा थांबेल, यात मोटरमॅनची मुख्य भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
चाचणी लवकरच
विमानतळ ते मिहान डेपोपर्यंत जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी. अंतरावर रुळ टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय वीज, सुरक्षा भिंत आणि अन्य कामेही लवकरच पूर्ण होणार आहे. केवळ प्रायोगिक चाचणीसाठी हैदराबाद येथून तीन कोचचे दोन सेट काहीच दिवसात नागपुरात येणार आहे. सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली असून चाचणीसाठी आम्ही तयार आहोत.
- बृजेश दीक्षित,
व्यवस्थापकीय संचालक,
महा-मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.