१० जानेवारीपर्यंत चीनहून नागपुरात येणार मेट्रो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:44 AM2018-12-10T10:44:30+5:302018-12-10T10:46:06+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे.
आनंद शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी २३ नोव्हेंबरला चीनची मेट्रो कोच तयार करणारी कंपनी ‘सीआरआरसी’च्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर मेट्रोच्या पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते. त्यावेळी दीक्षित यांनी रेल्वे एक महिन्यात नागपुरात येण्याची घोषणा केली होती. परंतु अजूनही मेट्रो रेल्वे चीनहून रवाना झालेली नाही.
२३ नोव्हेंबरला सीआरआरसीच्या डॉलियन प्रकल्पात मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रेल्वेला जहाजाने पाठविण्यासाठी पॅकिंग केले होते. या कामासाठी जवळपास १० ते १२ दिवस लागले. त्यानंतर रेल्वेला जहाजाने चेन्नईला पाठविण्याची वेळ आली तेव्हा जहाज उपलब्ध झाले नाही.
एक ते दोन दिवसात जहाज उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर जहाजाने मेट्रो रेल्वे चेन्नईला पोहोचण्यास १५ ते २० दिवस लागतील. चेन्नई येथे पोहोचल्यानंतर रस्ते मार्गाने नागपुरात आणण्यात येईल. त्याकरिता १० ते १२ दिवस लागतील. या प्रकारे रेल्वे नवीन वर्षाच्या १० जानेवारीपर्यंत नागपुरात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनची सीआरआरसी कंपनी डॉलियनच्या मेट्रो कोच कारखान्यात मेट्रो रेल्वे तयार करण्यात येत आहे. या कंपनीला मेट्रो प्रकल्पासाठी २३ रेल्वे (६९ कोच) तयार करण्याचे कंत्राट दिले आहे. एका कोचची किंमत ८.०२ कोटी रुपये आहे.
या रेल्वेत ३५ टक्के सुटे भाग भारत, जपान आणि अन्य देशात तयार झाले आहेत. मेट्रो रेल्वे तयार करण्यासाठी महामेट्रो आणि सीआरआरसी यांच्यात १५ आॅक्टोबर २०१६ ला लेटर आॅफ अलॉटमेंटवर (एलओए) स्वाक्षरी करण्यात आली होती.