नागपुरात सात महिन्यानंतर धावली मेट्रो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:41 PM2020-10-16T22:41:01+5:302020-10-16T22:42:18+5:30
Metro train runs, Nagpur News सात महिन्यानंतर मेट्रो रेल्वे शुक्रवारी पुन्हा रुळावर धावली. मेट्रोमध्ये प्रवास केल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ऑटाेपेक्षा मेट्रोचा प्रवास स्वस्तात होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात महिन्यानंतर मेट्रो रेल्वे शुक्रवारी पुन्हा रुळावर धावली. मेट्रोमध्ये प्रवास केल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ऑटाेपेक्षा मेट्रोचा प्रवास स्वस्तात होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
मेट्रो रेल्वेची सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह सुरू झाली आहे. शुक्रवारी रिच-३ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान अॅक्वा मार्गावर शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाली. दिवसभर मेट्रोच्या ४८ फेऱ्या झाल्या. अॅक्वा मार्गावर आठ स्टेशन खुले झाले आहेत. हिंगण्यातील अनेक नागरिक सीताबर्डी परिसरात काम करतात. त्यांनी लोकमान्यनगरवर गाड्या ठेवून सीताबर्डीपर्यंत प्रवास केला. बस बंद असल्याने सीताबर्डीपर्यंत येण्यासाठी ऑटाेने ५० रुपये भाडे लागायचे, पण मेट्रोने केवळ २० रुपये लागले. शिवाय मानसिक त्रास झाला नाही. मेट्रोचा प्रवास सुटसुटीत असून नागरिकांसाठी फायद्याचा असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. याशिवाय रविवार १८ ऑक्टोबरपासून रिच-१ मध्ये ऑरेंज मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मार्गावर मेट्रोचे आठ स्टेशन खुले झाले आहेत.