मेट्रोने लोकांच्या जीवनमानात बदल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:23+5:302021-08-19T04:09:23+5:30
नागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पाचा ३८.१ किमीचा पहिला टप्पा पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या मार्गावर डिसेंबरअखेरीस सुरू होणार आहे. सध्या दोन ...
नागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पाचा ३८.१ किमीचा पहिला टप्पा पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या मार्गावर डिसेंबरअखेरीस सुरू होणार आहे. सध्या दोन मार्गावर मेट्रो धावत आहे. याशिवाय दुसरा टप्पा केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यामुळे महानगर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात बदल होणार असल्याचे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.
दीक्षित म्हणाले, ४३.८ किमी दुसऱ्या टप्प्याचा विकास पूर्वेत ट्रान्सपोर्टनगर (कापसी), पश्चिमेकडे हिंगणा, उत्तर कन्हान आणि दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत राहणार असून, १० लाखांहून अधिक लोकांना फायदा होणार आहे. दीक्षित म्हणाले, झिरो माईल्स स्टेशन परिसरातील ४० हजार चौ.फूट जागेत ‘फ्रीडम पार्क’ तयार करण्यात येणार आहे. ते शहरी लँडस्केपिंगचे एक उत्तम उदाहरण राहील. यामध्ये स्ट्रीट स्केप, हिस्ट्री वॉल, वॉर ट्रॉफी तसेच कार्यक्रमांसाठी जागा व बरेच काही राहील. झिरो माईल्स फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क दोन्ही स्टेशनवरून शासकीय, निमशासकीय, सरकारी आणि खासगी कार्यालयातील लोक प्रवास करतील.
प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर दीक्षित म्हणाले, प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी फाईव्ह डायमेन्शनल बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर (५ डी बीआयएम) करण्यात येत आहे. नॉन-फेअर बॉक्स महसूल हा एकूण महसुलाच्या ५० टक्के राहणार आहे. झिरो माईल्स स्टेशनवर गगनचुंबी इमारत बांधणार आहे. पटवर्धन मैदान (धंतोली) पार्किंगसाठी उपलब्ध करून दिले आहे. येथून महसूल मिळेल. इतरही स्टेशनवर व्यावसायिक जागा आहेतच. शिवाय जाहिरातींच्या हक्कांचा लिलावदेखील होईल. तिकीट शुल्काशिवाय महसूल गोळा करण्यासाठी विविध योजना आहेत. शिवाय प्रकल्प ६५ टक्के सौर ऊर्जेवर कार्यरत आहे. सर्व स्टेशनवर पीव्ही सौर पॅनेल आहेत. कचरा व पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी स्टेशनवर बायो-डायझेस्टर स्थापन केले आहेत. स्टेशनवर प्रवाशांसाठी टॅक्सी, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, ई-स्कूटर, ई-सायकल आदी सेवा पुरविण्यात येत आहेत. स्टेशनवर विस्तृत पार्किंग जागा आहे.
महामेट्रो पुण्यात मेट्रो प्रकल्प उभारत आहे. या वर्षीच्या अखेरीस मेट्रो रेल्वे धावेल. नाशिक मेट्रो निओ प्रकल्पासाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. कंपनी नवी मुंबई मेट्रोच्या लाईन-१ चे उर्वरित काम पूर्ण करीत आहे. दहा वर्षांपर्यंत संचालन व देशरेख कंपनी करणार आहे. याशिवाय ठाणे आणि वारंगल मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) कंपनीने तयार केल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.