गरिबांच्या प्लॉटवर म्हाडाचा डोळा !
By admin | Published: September 7, 2015 02:56 AM2015-09-07T02:56:06+5:302015-09-07T02:56:06+5:30
म्हाडाने आपल्या एका योजनेतर्गंत मागील १५ वर्षांपूर्वी गरिबांना वाटप केलेले गोधनी येथील भूखंड आता परत घेऊन त्यावर फ्लॅट स्कीम उभारण्याचा नवा डाव आखला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर : म्हाडाने आपल्या एका योजनेतर्गंत मागील १५ वर्षांपूर्वी गरिबांना वाटप केलेले गोधनी येथील भूखंड आता परत घेऊन त्यावर फ्लॅट स्कीम उभारण्याचा नवा डाव आखला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र म्हाडाच्या या नवीन योजनेला येथील प्लॉटधारकांतर्फे तीव्र विरोध केला जात आहे.
माहिती सूत्रानुसार म्हाडातर्फे मौजा गोधनी येथील सर्वे क्र. ४०५/१,२, ७१/१,२ व सर्वे क्र. ४२२/१,२ येथील एकूण ४.३८ हेक्टर जमिनीवर २१० अत्यल्प उत्पन्न गट, ७६ अल्प उत्पन्न गट व २० मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी भूखंड विकासाची योजना तयार केली होती. यानंतर येथील ले-आऊटला १९९३ मध्ये नगर रचना विभागातर्फे मंजुरी देण्यात आली.
त्यानुसार १९९८-९९ मध्ये भूखंडधारकांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. परंतु तरी सुद्धा आजपर्यंत येथील भूखंडधारकांना त्यांच्या प्लॉटवर घर बांधण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. उलट आता म्हाडाने ती सर्व जमीन परत मिळवून त्यावर फ्लॅट स्कीम उभारण्याची योजना तयार केल्याची माहिती येथील प्लॉटधारक धर्मेद्र निपाने व मुरलीधर गजभिये यांनी दिली. शिवाय त्यांनी आमच्या हक्काच्या प्लॉटवर घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा त्या प्लॉटचा योग्य मोबदला मिळावा, अशी यावेळी मागणी केली.
दुसरीकडे येथील सर्वे क्र. ४०५/२ मधील जागेच्या सीमांकनावरू न नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या जागेची २००३ मध्ये पुनर्मोजणी करण्यात आली.
या पुनर्मोजणीनुसार येथील काही जागा रेल्वेमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुधारित मोजणी नकाशाप्रमाणे येथील ले-आऊटमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर २०१० मध्ये नगर रचना विभागाने उपरोक्त जागा मेट्रो रिजनमध्ये अंतर्गंत येत असल्यामुळे ले-आऊ ट मंजुरीकरिता नागपूर सुधार प्रन्यासकडे पाठविण्यात आला. नासुप्रने त्या ले-आऊट मंजुरीकरिता सध्याच्या नियमानुसार १० टक्के खुली जागा व १० टक्के सार्वजनिक उपयोगाची जागा सोडणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
परंतु येथील जागेवरील सर्व भूखंड वाटप झाल्याने १० टक्के जागा सोडायची कुठून, असा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)