‘एमएचटी-सीईटी’चा बंपर निकाल; संकेतस्थळ ‘स्लोडाऊन’मुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 07:20 AM2021-10-28T07:20:00+5:302021-10-28T07:20:02+5:30
Nagpur News अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलतर्फे आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल बुधवारी सायंकाळी घोषित करण्यात आले.
नागपूर : अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलतर्फे आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल बुधवारी सायंकाळी घोषित करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकालाची टक्केवारी अतिशय चांगली राहिली असून नागपुरातील वेदांत विकास चांदेवार व आशनी जोशी या दोघांना १०० पर्सेंटाईल प्राप्त झाले आहेत.
राज्यात ‘एमएचटी-सीईटी’चे आयोजन २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी व पालकांना प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी हा निकाल जाहीर झाला. तायवाडे कॉलेजचा विद्यार्थी वेदांत चांदेवार याने पीसीएम गटात १०० पर्सेंटाईल प्राप्त केले तर आशनी जोशी हिने पीसीबी गटात १०० पर्सेंटाईल मिळविले. पीसीबी व पीसीएम दोन्ही गटात मुंबई-पुण्याचा निकाल जास्त चांगला राहिला. दरम्यान. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल डाऊनलोड होण्यात अडचण येत होती. संकेतस्थळ संथ झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असल्याने संकेतस्थळ संथ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नियमित अभ्यासातूनच यश
कोरोनाकाळात अभ्यासापेक्षा इतर बाबींचाच जास्त तणाव होता. मात्र तरीदेखील पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले होते. नियमित अभ्यासावर भर दिला. ‘जेईई’मध्येदेखील चांगले गुण मिळाले असून आयआयटी-पवई येथे मी मेकॅनिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आहे, असे वेदांत चांदेवार याने सांगितले.