सरकारी गोंधळात एमएचटी-सीईटीची संधी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:13+5:302021-08-12T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उशिरा लागला व एमएचटी-सीईटीच्या नोंदणीची मुदत जुलैमध्येच संपली. निकालासंदर्भातील सरकारच्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांची नोंदणीची संधी हुकली आहे. सरकारकडून या सर्व बाबींचे अगोदर नियोजन का करण्यात आले नाही? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यपातळीवर एमएचटी-सीईटी ही परीक्षा घेण्यात येते. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून सर्व नियोजन होते. कोरोनामुळे या परीक्षेबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. जेईई-मेन्सच्या वेळापत्रकातदेखील बदल झाला व परीक्षा पुढे ढकलल्या गेली. त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढीस लागला.
एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जुलै ही होती, तर दुसरीकडे बारावीचा निकाल ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. निकालासाठी प्रतीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नाही. त्याचा त्यांना फटका बसला.
मुदतवाढ का दिली नाही ?
राज्य सामाईक प्रवेशप्रक्रिया कक्षातर्फे ८ जून रोजी एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती, तर १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार होती. ७ जुलै रोजी सूचना जारी करण्यात आली व विलंबशुल्काशिवाय १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. तोपर्यंत एमएचटी-सीईटी कधी होणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत संधी हुकलेल्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का दिली नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हावा
अगोदरच कोरोनामुळे आमच्या बारावीच्या वर्षात निकालाचा खेळखंडोबा झाला आहे. एमएचटी-सीईटी आणि बारावीचा निकाल घोषित करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता हेच दिसून आले आहे. कमीत कमी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवस तरी अर्ज भरण्याची संधी द्यायला हवी होती. विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हायला हवा होता, असे मत नीलेश वाघ या विद्यार्थ्याने व्यक्त केले.