उंदीर बनणार सुरक्षायंत्रणांचा ‘जासूस’, ‘रिमोट’द्वारे संचालित होणार मेंदूंच्या क्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 08:00 AM2023-01-06T08:00:00+5:302023-01-06T08:00:06+5:30
Nagpur News ‘डीआरडीओ’ने केलेल्या अफलातून संशोधनानुसार, आता चक्क उंदीरच सुरक्षा यंत्रणांचे गुप्तहेर बनू शकणार आहेत. ‘यंग सायंटिस्ट लेबॉरेटरी’ व ‘एटी’चे (असिमेट्रिक टेक्नॉलॉजी) संचालक पी. शिव प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.
योगेश पांडे
नागपूर : सुरक्षायंत्रणांच्या ‘नेटवर्क’मध्ये ‘इंटेलिजन्स’ला अतिशय जास्त महत्त्व असते व शत्रूंची गुप्त माहिती मिळावी यासाठी ‘एजंट्स’ जीवाची बाजी लावताना दिसून येतात. विशेषत: दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याच्या ‘ऑपरेशन्स’मध्ये तर ‘इन्पुट्स’वरच सगळे अवलंबून असते. हीच बाब लक्षात घेता ‘डीआरडीओ’ने अफलातून संशोधन केले आहे. चक्क उंदीरच सुरक्षायंत्रणांचे गुप्तहेर होतील, अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. संबंधित तंत्रज्ञानानुसार ‘रिमोट’द्वारे उंदरांच्या मेंदूंच्या क्रिया संचालित करता येणार आहेत. काही कालावधीत हे तंत्रज्ञान सुरक्षायंत्रणांना सोपविण्यात येणार आहे. ‘डीआरडीओ’च्या ‘यंग सायंटिस्ट लेबॉरेटरी’ व ‘एटी’चे (असिमेट्रिक टेक्नॉलॉजी) संचालक पी. शिव प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.
आपत्कालीन स्थितीत सुरक्षायंत्रणांना सहजपणे नेमकी माहिती मिळावी यासाठी ‘रॅट सायबोर्ज’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यात उंदरांच्या मेंदूमध्ये ‘ईईजी’ (इलेक्ट्रोएन्सोफॅलोग्राम) बसविण्यात येते. यात विविध सेन्सर्स असतात. ‘ईईजी’ थेट संगणकाशी जोडले जाते व तेथे बसलेला ऑपरेटर उंदराला नेमक्या दिशेकडे वळणे, थांबणे, मान वळविणे इत्यादी निर्देश देऊ शकतो. उंदरांना याबदल्यात त्यांच्या मेंदूंना सुखावणाऱ्या ‘इलेक्ट्रिक पल्स’ देण्यात येतात. यामुळे उंदरांच्या मेंदूकडून प्रत्येक निर्देशाचे पालन होते.
दुसरीकडे उंदरांच्या शरीरावर ऑडिओ व व्हिडीओ टिपणारी नॅनो यंत्रे लावण्यात येतात. त्यामुळे उंदरांच्या माध्यमातून कुठल्याही जागेवरील आवाज व चित्र कळू शकते. ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळांमध्ये यावर विस्तृत परीक्षण झाले आहे. यासाठी वैज्ञानिकांनी ‘ॲडव्हान्स अल्गोरिदम’ तयार केला आहे. यात ‘ऑटो कॅलिबरेशन’चा उपयोग करण्यात आला आहे.
उंदरांचीच निवड का ?
उंदरांची देशात संख्या फार मोठी आहे. तसेच उंदीर हे सहजपणे कुठेही जाऊ शकतात. शिवाय उंदरांच्या मेंदूला संबंधित यंत्रणा जोडण्याने त्यांच्या जीवनमानावर जास्त फरक पडत नाही. तसेच संचालित करणे सोपे राहते. साधारणत: एका वर्षाअगोदर या प्रयोगाला सुरुवात झाली होती.
दुसऱ्या टप्प्यात ‘वायरलेस कंट्रोल’
पहिल्या टप्प्यातील संशोधनानुसार उंदरांना वायर्सच्या माध्यमातून सेन्सर्स लावण्यात येतात. मात्र या प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात उंदरांच्या मेंदूवर ‘वायरलेस कंट्रोल’ राहणार आहे. त्यादृष्टीने सेन्सर्स व इतर यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उंदरांच्या डोक्यात एखाद्या व्यक्तीचे किंवा जागेचे चित्र ‘फिड’ करण्यात येईल. ती वस्तू दिसल्यावर आपोआपच थांबण्याचे निर्देश त्यांच्या मेंदूकडून देण्यात येतील. सुरक्षायंत्रणांसाठी हा प्रयोग अतिशय फायदेशीर राहणार आहे. सुरक्षायंत्रणांना सर्व औपचारिक प्रक्रिया आटोपल्यावर व ‘वायरलेस’चा प्रयोग यशस्वी झाल्यावरच तंत्रज्ञान सोपविण्यात येईल, अशी माहिती पी. शिव प्रसाद यांनी दिली.
‘रॅट सायबोर्ज’शी निगडित बाबी
- भारतीय तंत्रज्ञान वापरून प्रयोग
- उंदरांचे आयुष्य कमी होणार नाही याची काळजी
- सिंगापूरमध्ये ‘स्नेक सायबोर्ज’चा प्रयोग
- सेन्सर्स, नॅनो कॅमेरे यांचा उपयोग